ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. 16 - खासगी रुग्णालयांनी प्रसूती शुल्क वाढविल्याने सामान्य कुटुंबांना हे शुल्क परवडत नाही. मुलीचा जन्म झाल्यानंतर अनेक कुटुंबांकडून प्रसूती शुल्क भरण्याकडे दुर्लक्ष होते. मात्र डॉ. जगदीश भराडिया यांनी मुलीचा जन्म झाल्यास प्रसूती शुल्कच माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत या उपक्रमातून करण्यात येणार आहे.मार्केट यार्डमधील मर्चंट बँकेशेजारी डॉ. भराडिया यांनी आई स्वास्थ्य हॉस्पिटल व प्रसूती गृह सुरू केले आहे. डॉ. भराडिया यांनी पत्रकात म्हटले आहे की, मुलीचा जन्म झाल्यास सामाजिक जाणिवेतून प्रसूती शुल्क माफ करण्यात येईल. सिझेरियन झाले आणि मुलीचा जन्म झाला तर या शस्त्रक्रियेच्या बिलात 50 टक्के सूट दिली जाईल. समाजातील गोरगरीब, गरजू कुटुंबांनीच या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. भराडिया यांनी केले आहे. या अनोख्या योजनेचा प्रारंभ रविवारी (दि.19) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. डॉ. भराडिया यांनी अहमदनगरमध्ये मार्केट यार्ड चौकात ‘आई स्वास्थ्य हॉस्पिटल व प्रसूतिगृह’ सुरू केले आहे. हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ‘करू या मुलींचे स्वागत’ असे घोषवाक्यच हॉस्पिटलला दिले आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून सामाजिक सेवा घडावी, असा संकल्प डॉ. भराडिया यांनी केला आहे.
मुलगी जन्मल्यास प्रसूती शुल्क माफ
By admin | Published: March 16, 2017 7:29 PM