मुंबई - परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी केलेले आरोप आणि व्हायरल क्लिपसंदर्भात राष्ट्रवादीचे परळी मतदारसंघातील उमेदवार धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. त्यानंतर, तब्बल 22 तासांनी पंकजा मुंडे माध्यमासमोर आल्या. पण, घडल्याप्रकराबाबत त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. केवळ जमलेल्या लोकांना नमस्कार केला. पण, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरुन खासदार प्रितम मुंडेंनी खेद निराशा व्यक्त केली आहे.
आम्ही खिन्न झालो आहोत, आता सगळं सहन करण्यापलीकडे गेलंय. सगळ्या गोष्टी राजकारणाच्या नसतात, आता धनंजयचे बोलणे ऐकवत नाही. गलिच्छ आणि घाणेरड्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. तुमचे-आमचं नातें निवडणुकीपुरते नाही, असे सांगताना खासदार प्रितम मुंडे यांनाही भावना अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. गोपीनाथ मुंडे असते तर, असे बोलण्याची कुणाची हिंमत झाली नसती. रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल, असे म्हणत प्रितम मुंडेंनी धनंजय मुंडेंबद्दल नाराजी व्यक्त केली. अनेक दु:खे आली, पण खंबीरपणे पंकजाताई सामोऱ्या गेल्या. त्या कधीही खचल्या नाही, काहीही केले तरी त्या खचत नाहीत हीच त्यांची पोटदुखी आहे. एवढ्या खालच्या पातळीवरील टीका ऐकूनही त्या खचल्या नाहीत. मात्र, त्या उद्विग्न झाल्या आहेत. यापूर्वी मी त्यांना एवढे उद्विग्न झाल्याचे कधीही पाहिलेलं नाही, असेही प्रितम मुंडेंनी म्हटलंय.
दरम्यान, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन ते चुकीची व्हिडीओ क्लिप बनविण्यात आल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्यावर टीका करताना, आमच्या दोघात केवळ हाच फरक असल्याचं सांगत त्यांना टार्गेट केलं होतं. मी पंडित आण्णांच्या घरात जन्माला आलो आणि त्या गापीनाथ मुंडेंच्या घरात जन्माला आल्या. त्या मोठ्याच्या पोटी जन्माला आल्या, असे म्हणत धनंजय यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली होती. ''मला सहा बहिणी आहेत, मलाही तीन मुली आहेत. बहिण-भावाच्या नात्याला ज्यांनी डाग लावायचा प्रयत्न केला हे दुर्दैवी आहे. नव्याने आलेले लोकच बहिण-भावाच्या नात्यामध्ये विष कालवायचा प्रयत्न करत आहेत. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत मीही फिर्याद दाखल केली, पण पोलिसांनी माझी फिर्याद घेतली नाही. काहींना तर वाटतंय मी पृथ्वीतलावरच नसलो पाहिजे, हे मला खूप वेदनादायी आहे'', असेही धनंजय यांनी म्हटले आहे.