गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 12:10 AM2024-10-20T00:10:28+5:302024-10-20T00:12:46+5:30
Dhananjay Munde News: धनंजय मुंडे यांनी लोकमतला मुलाखत दिली. यावेळी त्यांना आज गोपीनाथ मुंडे आज असते, तर त्यांनी अजित पवारांना भाजपासोबत घेतलं असतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडेंनी काय उत्तर दिले?
Dhananjay Munde: शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत अजित पवार वेगळे झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही ताब्यात घेतला. त्यानंतर ते भाजपासोबत महायुतीत सामील झाले. पण, गोपीनाथ मुंडे आज ह्यात असते, तर काय? याच बद्दल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनी उत्तर दिले. गोपीनाथ मुंडे आज असते, तर ते २०१४ मध्येच मुख्यमंत्री झाले असते, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'लोकमत व्हिडीओ'चे संपादक आशिष जाधव आणि लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी धनंजय मुंडे यांची मुलाखत घेतली.
"...तर गोपीनाथ मुंडे २०१४ मध्येच मुख्यमंत्री झाले असते"
आज गोपीनाथ मुंडे असते, तर? असा प्रश्न धनंजय मुंडेंना मुलाखती दरम्यान विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले, "मी म्हणतो की, २०१४ लाच मुंडे साहेब मुख्यमंत्री झाले असते."
त्यालाच जोडून असा प्रश्न विचारण्यात आला की, आज गोपीनाथ मुंडे भाजपमध्ये असते, तर तुमच्यासकट तुमच्या पक्षासकट अजित पवारांना भाजपासोबत घेतलं असतं? त्यांनी घेऊ दिलं असतं का?
गोपीनाथ मुंडेंबद्दलच्या प्रश्नाला धनंजय मुंडेंनी काय दिलं उत्तर?
धनंजय मुंडे उत्तर देताना म्हणाले, "का नाही? यासंदर्भात अनेक मागचे खुलासे मी करणार नाही. पण, एक लक्षात घ्या. ज्यावेळी भारतीय जनता पार्टी हा निर्णय करते. आणि भारतीय जनता पार्टी निर्णय करत असताना त्यात स्वर्गीय मुंडे साहेबांचं मत व्यक्त केलं असतं. आग्रह धरला असता. पण, शेवटी पक्षाचा जो निर्णय आहे, तेच आतापर्यंत पाळत आलेले आहेत. मी जे पाहिलं, त्याच्यावरून तुम्हाला सांगतो", असे उत्तर धनंजय मुंडेंनी दिले.