माझ्यामते दूध आणि दह्यावर जीएसटी लावण्याऐवजी व्हॉट्सअॅपवर जीएसटी लावला हवा, कारण त्यावर कुणीही वाटेल ते टाकत असतात, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्त वाहिणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. यावरून आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी राज यांच्यावर निशाणा साधला आहे. "बदनामी करण्याच्या कंत्राटावरही जिएसटी लावला तर मिमीक्री बंद होईल," असे दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे.
काय म्हणाल्या दीपाली सय्यद - "माननीय राजसाहेब व्हॅाट्सॲपवर जिएसटी लावला तर तुमचे कार्यकर्ते लोकांची बदनामी करणार कसे? ग्रीन-टीच्या व्हिडीओला शिलेदार दारू म्हणून पसरवून पक्षाची इज्जत वाचवताना आम्ही पाहिले आहे, बदनामी करण्याच्या कंत्राटावरपण जिएसटी लावला तर मिमीक्री बंद होईल," असे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे.
नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे -राज ठाकरे यांनी आपल्या या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केले. सध्या जीएसटी वाढवल्याने मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. यावर मिश्किल प्रतिक्रिया देर राज म्हणाले होते, माझ्यामते आता दूध, दह्यावर जीएसटी लावण्याऐवजी व्हॉट्सअॅपवर जीएसटी लावायला हवा. कारण ज्याला जे वाटेल ते तो तेथे टाकत असतो. एवढेच नाही, तर हल्ली सगळीकडे अगदी पत्रकारितेतही हीच गोष्ट झालेली आहे. अनेक स्तंभलेखक वेगवेगळ्या पक्षाचे झाले आहेत. स्वतंत्र पत्रकार खूप कमी उरले आहेत, असेही राज ठाकरे यांनी म्हटले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर... -या मुलाखतीत राज यांनी शिवसेनेतील बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात सत्तानाट्य घडले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन पायऊतार व्हावे लागले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर हे शक्यच झाले नसते, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले होते.