मुंबई : गृहनिर्माण योजना निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात आली नाही तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे विकासक बदलण्याची कारवाई केली जाईल, असे आदेश गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी दिले.वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्यालयात गृहनिर्माणमंत्र्यांनी घाटकोपर येथे राबविण्यात येत असलेल्या जवळपास ३० योजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली. या वेळी ते बोलत होते. रखडलेल्या झोपु योजनांबरोबरच घाटकोपर येथील झोपड्यांचा बायोमेट्रिक सर्व्हे आणि केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांच्या म्हणजेच रेल्वे आणि संरक्षण खात्याच्या जमिनीवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांबाबत बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आले. घाटकोपर येथील शांती नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, अष्टविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच इतर संस्थांच्या रखडलेल्या योजनांबाबत महेता यांनी संबंधितांच्या शंकांचे निरसन केले. तसेच झोपडीधारकांना पक्की घरे लवकर मिळावी यासाठी मंत्र्यांनी अधिकारी वर्गाला योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
गृहनिर्माण योजना निश्चित कालावधीत पूर्ण न केल्यास एसआरए विकासक बदलणार - प्रकाश महेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 2:21 AM