नागपूर - जयंत पाटील यांच्यावर भाजपाकडून दबाव होता. भाजपाचा प्रस्ताव मान्य केला नाही म्हणून जयंत पाटील यांच्यावर ईडी कारवाई झाली असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तर राऊतांचा हा दावा भाजपाने फेटाळला. पण २ वर्षापूर्वी मलाही भाजपाने प्रस्ताव पाठवला होता असं विधान माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केले आहे.
अनिल देशमुख म्हणाले की, २ वर्षापूर्वी मी भाजपासोबत समझोता केला असता तर मला अटक नसती झाली. पण २ वर्षापूर्वीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार पडले असते. मी शरद पवारांच्या उपस्थितीत हे विधान वर्धातील सभेत केले होते. माझ्याकडे जो प्रस्ताव आला होता त्याने मला अटक झाली नसती पण सरकार पडले असते. याचा अर्थ तुम्ही समजून जा असं त्यांनी म्हटलं आहे.
मविआत जागावाटपाची चर्चा होईलमहाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चेला बसतील, कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची, मतदारसंघ कोणत्या पक्षाला द्यायचा हे ठरवतील. त्यानंतर मतदारसंघात जो कुणी उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते दिवसरात्र प्रयत्न करतील असा विश्वास अनिल देशमुखांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी पक्ष सर्वसमावेशक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे २ दिवसीय पदाधिकारी शिबीर नागपूरात आहे. या शिबिराला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यापासून सगळेच हजर असतील. अतिशय महत्वाचे शिबीर असून त्याला नेते मार्गदर्शन करतील. पक्षाकडून विविध शिबीर आयोजित केले जातात. ओबीसीचे राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहतील. आमचा पक्ष सर्वसमावेशक, जातीधर्माचे लोकांचा आहे. कुठल्याही एका जातीचा आणि धर्माचा नाही असंही अनिल देशमुख यांनी सांगितले.