मुंबई : माझ्यासोबत जे ५० आमदार आहेत त्यांना सगळ्यांना २०२४ च्या निवडणुकीत निवडून आणणारच आणि आमच्या शिवसेना-भाजप युतीने २०० जागा जिंकल्या नाहीत तर मी राजकारण सोडून शेतावर जाईल, असा निर्धार व्यक्त करतानाच शिवसेना, हिंदुत्व वाचविण्यासाठी, शिवसैनिकांसाठी आपण उठाव केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.
शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर झालेल्या अभिनंदनपर भाषणांना उत्तर देताना शिंदे म्हणाले की, जे घडले ते एका दिवसात घडलेले नाही. एकीकडे पक्षाकडून मला चर्चा करा म्हणत होते, दुसरीकडे मला पक्षनेतेपदावरून काढून टाकले. मुख्यमंत्रिपदासाठी मी उठाव केला नाही. आमच्यासोबतच्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. भाजपसोबत चला असे मी उद्धवजींना पाचवेळा सांगितले. पण मला अपयश आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारा पक्ष (काँग्रेस) आमच्यासोबत होता, पण आम्ही काही बोलू शकत नव्हतो, असे ते म्हणाले.
माझ्या घरावर दगड मारणारा पैदा झाला नाहीआमदारांच्या घरावर दगडफेक केली गेली. त्यांचे पुतळे जाळण्यास सांगितले. तीस-पस्तीस वर्षे रक्ताचे पाणी आम्ही ज्या पक्षात केले त्यांनी आमचे खच्चीकरण केले. पण एक लक्षात ठेवा एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारणारा अजून पैदा झाला नाही. आमच्याकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, तरी आम्ही संयम ठेवला. पण संयमाची परीक्षा घेऊ नका, असे आव्हान शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिले. वयाच्या सतराव्या वषी शिवसैनिक झाल्यापासूनचा प्रवास सांगताना त्यांनी, अंगावर घेतलेल्या केसेस, ठाण्यातील सोळा लेडीज बार उद्ध्वस्त केल्याची घटना, ठार मारण्याचे झालेले प्रयत्न अशा घटनांचाही उल्लेख केला.
तेव्हा मीच मुख्यमंत्री होणार होतो...महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा मीच मुख्यमंत्री होणार होतो. पण पक्षातील काही नेत्यांनी खोडा घातला, असे म्हणताना शिंदे यांनी कोणाचे नाव घेतले नाही. तुम्हालाच मुख्यमंत्री करणार होते, पण तुमच्या पक्षातून विरोध झाला, आमचा विरोध नव्हता असे नंतर एकदा मला अजित पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे सांगितले असे म्हणत शिंदे यांनी पवार यांच्याकडेही बोट दाखविले.
शिवसेनेला त्रास कसा झाला त्याचे दिले दाखलेअजित पवार यांनी राष्ट्रवादीचे शंभर आमदार जिंकविण्याचे लक्ष्य ठेवले होते. जयंत पाटील जिथे जायचे तिथे पुढचा आमदार आमचाच असे बोलायचे. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ खडसेंच्या भीतीने वाँटेड आहेत, असे मला तिथले आमदार चंद्रकांत पाटील सांगत होते. सांगलीचे आमचे आमदार अनिल बाबर त्रस्त होते. आमचे पदाधिकारी आनंदराव यांना मोक्का लावला. राष्ट्रवादीत येण्यासाठी धमक्या दिल्या गेल्या. तो माझ्याकडे येऊन ओक्साबोक्शी रडत होता. एका मिनिटात त्याची फाईल रद्द करता आली असती, पण केले नाही.
पक्षाशी गद्दारी केली नाही
मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही आणि तसे झाले तर मी माझे दुकान बंद करेल, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे जळगावच्या सभेत म्हणाले होते की, आघाडी सरकारमुळे राज्याची १५ वर्षे सडली. मग अशावेळी आम्ही किती दिवस तुमच्याबरोबर बसणार होतो, असा सवाल शिंदे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला केला. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना मी बाहेरून तीन मते आणली पण ते पडले. आमच्यातले लोक म्हणत होते की जो (संजय राऊत) आला तो पडायला पाहिजे होता. विधान परिषदेत आम्ही दोघांनाही निवडून आणले, पक्षाशी गद्दारी केली नाही, असे शिंदे म्हणाले.
अजित पवार यांनाही काढले चिमटेअजित पवार माझ्याही विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घ्यायचे, पण मी विरोध केला नाही. माझ्या खात्याचा समांतर हेड त्यांनी निर्माण केला, आठशे कोटी रुपये वळविले पण मी काहीही बोललो नाही. मी मोठे मन ठेवले, मी कद्रू नाही. काम करणारी अजितदादांसारखी माणसे मला आवडतात, ते रोखठोक स्वभावाचे आहेत. पण माझ्या विभागात हस्तक्षेप करत होते, असा चिमटाही त्यांनी काढला.
कामाख्या देवी म्हणाली, तो वेडा मला नकोआम्ही गुवाहाटीला गेलो तर आम्हाला गटार, नाल्याची घाण म्हणत आमचे बळी जातील, पोस्टमार्टेम होईल अशी भाषा वापरली गेली. आम्हाला वेडे म्हटले गेले. पण कामाख्यादेवीच बोलली की, जो असे बोलला तो वेडा आता नको, असे म्हणत शिंदे यांनी खा. संजय राऊत यांचे नाव न घेता चिमटे काढले.