पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. लोकसभेवेळी वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला होता. आता आणखी एका पक्षाची स्थापना होणार असून बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंनी याची आज घोषणा केली आहे. तसेच विधानसभेच्या 288 जागा लढणार असल्याचे सांगताना त्यांनी निवडणूक लढण्यास इच्छुक कार्यकर्त्यांना संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.
अभिजित बिचुकले हे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे यांच्याविरोधात लढल्याने चर्चेत आले होते. यानंतर बिचुकलेनी मराठी बिग बॉसमध्ये एन्ट्री केली आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते. आज बिचुकलेनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अखिल बहुजन समाज सेना पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली. अभिजीत बिचुकले हे अखिल बहुजन समाज सेनेचे सचिव आहेत.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्यावर जोरदार टीका केली. भ्रष्ट प्रशासनास धडा शिकवण्यास चांगला मुख्यमंत्री हवा असतो. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर शर्ट बदलून जॅकेट वापरायला लागले. हा बदल आहे का, हा विकास झाला का? त्या टरबुजला काही अनुभव आहे का? असा सवाल विचारला. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना बिचुकलेंची जीभ घसरली.
मला लोकांनी मोठे केले आहे. त्यांनीच मला डोक्यावर घेतलेय. मला बिग बॉसचं नाही, समाजातल्या प्रश्नाचं कौतुक आहे, असे त्यांनी सांगताना शरद पवारांची स्तुती केली. मात्र, त्यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचा इशाराही दिला.
शरद पवारांवर निवडणुकीच्या तोंडावर ईडीने गुन्हा दाखल करण्यावरूनही त्यांनी टीका केली. पवारांवर गुन्हा दाखल करण्याआधी इतके झोपले होते का? आता का करत आहात? इचकी वर्षे काय केलं? महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यात पवारांचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
साताऱ्यातून पवार लोकसभा लढणार असतील तर...उदयनराजेंनी साताऱ्यातून शरद पवार लढणार असतील तर आपण निवडणुकीतून माघार घेण्याचे भावूक वक्तव्य केले होते. यावरून शरद पवार पोटनिवडणूक लढवतील अशा चर्चा होत आहेत. यावर बिचुकलेंनी भाष्य केले. उदयनराजे शिवरायांच्या घराण्यात जन्माला आले आहेत. तरी त्यांच्यासमोर लोकशाही पद्धतीने लढलो. तर मग शरद पवारांना का सोडू? पवार उभे राहिले तर 100 टक्के लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लोकसभा लढणे अधिक योग्य वाटते. माझं हिंदी आणि इंग्रजी अधिक चांगल आहे, असेही बिचुकले यांनी म्हटले.