यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भक्कम बहुमत मिळाले, यामुळे लोकसभेत गाजलेला जरांगे फॅक्टर मोडीत निघाला असा अंदाज राजकीय वर्तुळात लावला जात आहे. अशातच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेत मी मैदानात असतो आणि समीकरण जुळली असती तर सुफडा साफच केला असता असे वक्तव्य केले आहे.
सरकार तयार झाले की मी आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहे. हे उपोषण मुंबईत देखील होऊ शकते. अंतरवली सराटीमध्ये यंदा घराघरातील मराठे सामूहिकरित्या आमरण उपोषणाला बसणार आहेत. राज्यभरातचे मराठा बांधव एकाच ठिकाणी जमणआर असून तिथेच उपोषणाला बसणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
कोणीही मुख्यमंत्री म्हणून आले तरी मराठ्यांपेक्षा मोठे या राज्यात कोणी नाही. महाराष्ट्रातील आरक्षणात 100% गेल्याशिवाय मी हटत नाही आणि आरक्षण तर हे ओबीसी मधूनच घेणार आणि हे आमचे फायनल आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे. नव्या आमदारांना मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडावाच लागेल नाहीतर त्यांना मराठे रस्त्यावर फिरू देणार नाहीत, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत मी आणि माझा समाज मैदानातच नव्हता. यावेळी दोरी मराठ्यांच्या हातात होती. मालक तो होता आणि त्याला कोणच्या दावणीला न बांधता त्यालाच मालक ठेवले. ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याबद्दल छाती बडवण्याची मला सवय नाही असा टोला जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना लगावला. विधानसभेत मी मैदानात असतो आणि समीकरण जुळली असती तर सुफडा साफच केला असता. हा तर नुसता ट्रेलर पण नाही, आणखी पुढे खूप मजा येणार आहे. फक्त तुम्ही आरक्षण देऊ नका म्हणा मी तुम्हाला कचका दाखवतो, असे जरांगे म्हणाले आहेत.