मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या २०१६ ते २०२० या कालावधीतील वेतन करारासाठी महामंडळाने केलेल्या एकतर्फी घोषणेत अपेक्षित वेतन मिळत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने पुन्हा संपाचा इशारा दिला आहे. महामंडळाने जाहीर केलेल्या ४ हजार ८४९ कोटींमध्येच संघटनेने प्रशासनास सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेतला नाही, तर कायदेशीर तरतुदीच्या अधीन राहून संपासह सर्व तºहेचे आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने शनिवारी रात्री जाहीर केला आहे.
एसटी कामगारांच्या मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले की, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी वेतन कराराची घोषणा करताना ४ हजार ८४९ कोटी रुपयांची तरतूद करत कामगारांना किमान ३२ ते ४८ टक्के वेतनवाढ मिळेल, असे सांगितले होते. मात्र कामगारांना पूर्ण रकमेचे वाटप होत नसल्याने अपेक्षित वेतन मिळत नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
मान्यताप्राप्त संघटनेने परिवहनमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार ३१ मार्च २०१६चे मूळ वेतन अधिक १ हजार १९० रुपये या रकमेस २.५७ ने गुणण्याचा सुधारित प्रस्ताव १५ जून २०१८ला सादर केला आहे. मात्र प्रशासनाने त्यास सहमती दिलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने जाहीर केलेल्या रकमेचे पूर्ण वाटप होत नसल्याने संघटनेने वेतन करारावर स्वाक्षरी केलेली नसल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.कंत्राटीकरणाला विरोधशिवशाही गाड्या भाडेतत्त्वावर देणे, बस स्थानके व कार्यालये साफसफाई करण्यासाठी खासगी कंत्राटदाराला ४४६ कोटींचे कंत्राट देणे या सर्व गोष्टी पाहता महामंडळामध्ये अप्रत्यक्षरीत्या खासगीकरण आणल्याचा आरोप संघटनेचे हनुमंत ताटे यांनी केला. त्याबाबत फेरविचार झाला नाही तर संपाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.