पिंपरी : कोरोनाच्या महामारीत रास्त भाव रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र त्याला शासनाने नकार दिला आहे. त्यामुळे राज्यातील रेशनिंग दुकानदार १ जूनपासून धान्य खरेदी तसेच विक्री थांबविणार आहेत. ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकिपर फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना याबाबत निवेदन दिले आहे. राज्यातील रेशनिंग दुकानदारांना तसेच त्यांच्या मदतनिसांना विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे वारंवार केली. त्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविल्याचे २८ एप्रिल रोजी सांगण्यात आले. मात्र २९ मे रोजी निघालेल्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार कोरोना विषाणूच्या संपर्कात येणाऱ्या आरोग्य तसेच अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात आले. परंतु रास्त भाव रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांचा त्यात समावेश करण्यात आला नाही. रेशन दुकानदार नागरिकांशी थेट संपर्कात येतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाही रेशन दुकानदारांनी दुकाने चालू ठेवली आहेत. गरजू ग्राहक व लाभार्थ्यांना त्यांच्याकडून धान्य वितरीत केले जात आहे. त्यामुळे रेशन दुकानादार व त्यांच्या मदतनिसांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. शासनाचे थेट कर्मचारी नसले तरी ते शासनाचे प्रतिनिधी म्हणूनच धान्य वितरण करतात. या दुकानदारांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांचे कुटुंब उघड्यावर येईल, त्यामुळे विमा संरक्षण देण्यात यावे. अन्यथा राज्यभरातील ५२ हजार रेशन दुकानदार सोमवार, दि. १ जूनपासून शासनाच्या गोदामातून धान्य उचलणार नाहीत किंवा धान्याचे वितरण देखील करणार नाहीत, असे निवेदनात नमूद केले आहे.
...अन्यथा राज्यभरातील ५२ हजार रेशन दुकानदार १ जूनपासून धान्य वितरण थांबविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 9:21 PM
रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र त्याला शासनाने नकार दिला आहे..
ठळक मुद्देराज्यातील रेशनिंग दुकानदारांना, त्यांच्या मदतनिसांना विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाही रेशन दुकानदारांनी दुकाने आहेत सुरू