"कायदा व सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 09:52 PM2023-06-16T21:52:17+5:302023-06-16T21:52:44+5:30

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली

If law and order cannot be maintained, Devendra Fadnavis should resign as Home Minister - Congress Nana Patole | "कायदा व सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे"

"कायदा व सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे"

googlenewsNext

मुंबई - राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. धार्मिक दंगली होत आहेत, महिला असुरक्षित आहेत, मंत्रालयाजवळच्या वसतीगृहात मुलीवर अत्याचार व हत्या झाली, लोकलमध्ये मुलीवर अत्याचार झाला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा-सहा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. मंत्रालयातील अनेक विभाग आहेत त्यामुळे त्यांना गृहमंत्रिपद झेपत नाही. फडणवीस यांना जमत नसेल तर त्यांनी गृहमंत्रिपद सोडावे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. 

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा वारकऱ्यांवर लाठीमार करून या सरकारने वारकरी संप्रदायाचा अपमान तर केला आहे त्यासोबत या महान परंपरेला गालबोट लावण्याचे पाप ही केले आहे. पण लाठीहल्ला झालाच नाही असे गृहमंत्री खोटे बोलत आहेत. खोटं बोलून तुमची पापं लपवता येणार नाहीत हे लक्षात ठेवावे असा हल्लाबोल त्यांनी केला. कोअर कमिटीच्या बैठकीला विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगाणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, उपस्थित होते.

मेरिटच्या आधारावर जागा वाटपाचा निर्णय  
लोकसभा निवडणुकीच्या जागांचा आढावा घेताना मताचे विभाजन होणार नाही यावरही भर दिला जात आहे. देश वाचवण्याची ही लढाई असून देश, लोकशाही, संविधान वाचवणे हे आमचे काम आहे. जागा वाटपाचा निर्णय मविआच्या बैठकीत मेरिटच्या आधारावर होईल. भाजपाचे सत्तेतून उच्चाटन करण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र येऊन प्रयत्न करु हाच आमचा मुख्य उद्देश आहे असं नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या प्रत्येक जागेचा बारकाईने अभ्यास केला आहे. मविआची बैठक होईल त्यावेळी प्रत्येक जागा कशी जिंकता येईल यावर आम्ही सर्वजण विचार करु. पुढच्या आठवड्यात इतर समविचारी पक्षांबरोबरही चर्चा करणार आहोत.  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे २५ जूनला सांगली येथे एका कार्यक्रमासाठी येत आहेत, त्यांच्याबरोबरही बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल. निवडणुकीत शेतकरी, बेरोजगारी, महागाई हे प्रमुख मुद्दे असतील. देशातील या ज्वलंत मुद्द्यांवर जनतेत जाऊन भाजपा सरकारची पोलखोल करु. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडे कोणताही प्रस्ताव दिलेला नाही जेव्हा त्यांचा प्रस्ताव येईल त्यानंतर त्यावर चर्चा करु. मविआने एकत्र राहून निवडणुका लढवाव्या हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे असं पटोलेंनी सांगितले. 

नाव बदलून नेहरूंचे योगदान पुसता येणार नाही
पंडित जवाहरलाल नेहरु यांचे नाव भाजपा सरकारने बदलले यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने भाजपा मतं मागते आणि नंतर स्टेडियमचे नाव बदलून मोदी स्वतःचे नाव देतात. पंडित नेहरु यांच्या नेतृत्वामुळेच भारताचा विकास झाला, सर्व क्षेत्रात प्रगती झाली. त्यामुळे नेहरुंचे नाव बदलल्याने नेहरुंची कर्तृत्व कमी होत नाही, अशी नावे बदलून त्यांच्या या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि स्वातंत्र्यानंतर या देशाला आधुनिक विकसित करण्यासाठी त्यांनी जे मोलाचे योगदान दिले आहे ते पुसता येणार नाही, असेही पटोले म्हणाले.

Web Title: If law and order cannot be maintained, Devendra Fadnavis should resign as Home Minister - Congress Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.