Maratha Reservation : ...तर इथे यावं लागलं असतं का? राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 06:26 AM2021-05-12T06:26:14+5:302021-05-12T06:26:22+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा काही संघटनांनी दिला आहे.
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणारा जो कायदा आधीच्या सरकारने केला होता तो ‘फूलप्रुफ’ (परिपूर्ण / बिनचूक) असता तर आज इथे येण्याची वेळ कशाला आली असती, असा प्रतिसवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांच्या प्रश्नांना ठाकरे यांनी उत्तरे दिली. हा कायदा फूलप्रुफ होता. पण, सध्याच्या सरकारला तो टिकवता आला नाही, या विरोधकांच्या टीकेबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले की, त्या फुलप्रुफ कायद्याचे काय झाले ते आज सगळ्यांसमोर आहेच. तसे असते तर आज या ठिकाणी यायची वेळ आमच्यावर आलीच नसती.
मराठा समाज संयम राखेल
मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा काही संघटनांनी दिला आहे. याकडे लक्ष वेधले असता ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाने आजवर संयमच दाखविला आहे. आपली लढाई राज्य सरकारविरुद्ध नाही, हे त्यांना पटलेले आहे. सरकार आणि सगळेच राजकीय पक्ष त्यांच्यासोबत आहेत तसेच मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत.
राज्यपालांबद्दल आदरच
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी आलेली कटुता आता संपली आहे का, या प्रश्नात ठाकरे म्हणाले की, कटुता, गोडवा असे काही नसते. समोरून जसे बोलले जाते तसे उत्तर आम्ही देतो. राज्यपालांबद्दल आम्हाला आदर आहे आणि पुढेही राहील.
...हा दुटप्पीपणा; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
‘मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा फुलप्रुफ नव्हता! किती हा दुटप्पीपणा’, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजप सरकारच्या काळात हाच कायदा उच्च न्यायालयात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालयसुद्धा स्थगिती देण्यास नकार देते आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते व कायदाही अवैध ठरतो. मग मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण, असा सवालही त्यांनी केला.