पुणे : भक्तांसाठी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात लागू करण्यात येणाऱ्या ड्रेसकोड संदर्भातल्या निर्णयाला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी ठाम विरोध दर्शवला आहे. नवरात्री उत्सवाच्या आधी देवस्थान समितीने हा निर्णय मागे नाही तर थेट देवस्थान समिती सदस्यांना चोप देऊ अशी भूमिका देसाई यांनी पुण्यात घेतली आहे.देसाई यांच्या भूमिकेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
येत्या १० ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवापासून महालक्ष्मी मंदिरात कमी उंचीचे कपडे किंवा स्कर्ट घालून प्रवेश करू नये असा निणय पश्चिम महाराष्ट्राच्या देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर यांच्यावतीने घेण्यात आला आहे. या निर्णयावर आता समाजाच्या विविध माध्यमातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनीही या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
आता या विषयात देसाई यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहेत. त्या म्हणाल्या की,व्यक्तीच्या कपड्यांवरून देवावरील भक्ती यांनी ठरवू नये. समितीने महिलांच्या दर्शनाबाबत घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा समिती प्रमुखांना भूमाता ब्रिगेड चोप देणार असल्याचेही त्या म्हणाल्या. इतकेच नव्हे तर सत्ताधारी भाजप पक्ष या निर्णयामागे असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर देवस्थानचे प्रमुख भाजपचे आहे. भाजप समोर येऊन हा निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे समितीला पुढे करुन भाजपकडूनच असे निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नवरात्र उत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असताना हा वाद वाढण्याची शक्यता आहे.