ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 24 - मराठ्यांना न्याय मिळाला नाही तर प्रसंगी नक्षलवाद्यांच नेतृत्व करेन अशी धमकीच मराठा मूक मोर्चासाठी नाशिकमध्ये हजेरी लावलेल्या खासदार उदयनराजे भोसलेंनी दिली आहे. मोर्चानंतर उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन नेहमीच्या स्टाईलप्रमाणे सडेतोड मत व्यक्त केलं.
'कोपर्डीतील बलात्कार ही छत्रपती शिवाजींच्या स्वराज्याला काळिमा आहे. त्या नराधमांना जाहीर फाशी द्या. अशा नराधमांना लोकांसमोर गोळ्या घालायला हव्या, असं उदयनराजे बोलले आहेत. मराठे मोर्चे हे कोणत्याही जातीच्या विरोधात नाही. त्वरित न्याय देणे देशाच्या हिताचं आहे. न्याय मिळत नसल्याने लोकांचा सरकारांवरचा, पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे. सामाजिक समतोल टिकायचा असेल तर कायद्यात बदल करा,' अशी मागणी यावेळी उदयनराजेंनी केली.
'मराठ्यांनी मूकमोर्चे काढले आहेत. परिस्थिति बिघडली तर उद्रेक होईल. लीबिया, सीरिया सारखी परिस्थिति होऊ देऊ नका. पक्षपेक्षा देशाचा विचार करा. मराठा ही जात नाही जीवन जगण्याची संस्कृती आहे. स्पर्धेच्या युगात फक्त मेरिट हाच निकष असला पाहिजे. मराठा सोडून सर्वांना आरक्षण देतात. कुठल्याही जातीचा असो, आर्थिकदृष्टया गरीब असेल त्याला आरक्षण द्या. स्पर्धेच्या युगात आरक्षणामुळे प्रगती खुंटली आहे,' असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं.
'जाती-जातींचे मोर्चे निघताय, पण ही काय स्पर्धा लागली आहे का? असा सवाल उदयनराजेंनी यानिमित्ताने उपस्थित केला. आरक्षण असल्याने भारतातले संशोधक अमेरिकेत गेले. राज्यकर्त्यांनी जाती तयार केल्या.नेते अभिनेत्यांपेक्षा जास्त चांगला अभिनय करतात. सर्वाधिक कर्जांची परतफेड शेतकरी करतात, उद्योगपती कर्ज बुडवतात,' असा टोमणा उदयनराजेंनी मारला.
'पैशांचा गैरवापर करुन न्याययंत्रणा आणि पोलिस यंत्रणांना ताब्यात घेऊन चेष्टा केली जात आहे. स्पर्धेच्या युगात फक्त मेरिट हाच निकष असला पाहिजे. मेक इंडिया नाही तर ब्रेक इंडिया होत आहे. कायदा नव्हता तेव्हाही लोक जगतच होते. आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत धड़ा शिकवा. आरक्षण, अॅट्रोसिटीवर निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यात यावं,' अशी मागणी उदयनराजेंनी यानिमित्ताने केली.