बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी भरसभेत भाजपाच्या नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चुका माणसांकडून होतात, पक्षावर कशाला राग काढता, असा सवाल करत एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, "नाथाभाऊंची वेदना समजू शकतो. त्यांनी दु:ख व्यक्त केलं, त्यात चूक नाही. आपल्या तक्रारी आणि व्यथांची पक्ष दखल घेईल, त्यावर उत्तर काढू, पण भविष्यात सगळं नीट झाल्यावर अपराधी किंवा संकोच वाटेल असे संवेदनशील शब्द वापरु नका, अशी दोघांना विनंती, त्याचे ओरखडे राहतात."
याचबरोबर, नाथाभाऊ तुम्ही जाण्याची किंवा स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा करु नका. पक्षाच्या चुका झाल्या नाहीत. चुका माणसांच्या झाल्यात. पक्षावर कशाला राग काढताय. तुम्ही बोला की तू काल आला आहेस. आम्ही पक्षातच राहणार आहे. तू जायचे तर जा, असे तुम्ही आम्हाला म्हणा आणि पक्षात राहून संघर्ष करा, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना समजवण्याचा प्रयत्न केला.
गोपीनाथ मुंडेंच्या प्रेरणेमुळेच आम्ही शरद पवारांना अंगावर घेऊ शकलो. पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकू शकलो. गेल्या पाच वर्षात गोपीनाथ यांच्या प्रेरणेमुळे पश्चिम महाराष्ट्रात जागा वाढल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याशिवाय, गोपीनाथ मुंडे भरल्या ताटावरुन उठून गेल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, पण मुंडेंच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी कुटुंबाला समर्थपणे सावरले, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शेठजी, भटजी पक्ष म्हणून भाजपाची ओळख होती. त्याला बहुजनाचा चेहरा देण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले असे एकनाथ खडसे म्हणाले. तसेच, भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना असल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्यातील भाजपा नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.