मुंबई : अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरुन झालेल्या वादात भाजप अन शिवसेनेची युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसची साथ घेत शिवेसेनेचा मुख्यमंत्री केला. 'पंतप्रधान नरेंद्र माेदी किंवा अमित शाह यांच्यापैकी एकाने एक जरी फाेन केला असता आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असती तर युती तुटली नसती' असे वक्तव्य आता खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात केले.
युती तुटल्यानंतर राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या पाठींब्यावर शिवसेनेने सरकार स्थापन केलं. या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून खुद्द उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्यारुपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली आहे. भाजपने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचे वचन दिले हाेते. परंतु ते माेडल्याने भाजपशी युती ताेडल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले हाेते. एका मराठी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बाेलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप शिवसेनेच्या युतीबाबत वक्तव्य केले आहे. 'पंतप्रधान नरेंद्र माेदी किंवा अमित शाह यांच्यापैकी एकाने एक जरी फाेन केला असता आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असती तर युती तुटली नसती' असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. तसेच 'मोदी आणि शाह यांनी राज्य हातातून जाऊ दिलं पण एक फोन करुन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली नाही. मला त्यांच्या या भूमिकेचं आश्चर्य वाटतं आहे. मात्र त्यांनी हे केलं ते चांगलंच झालं आमचा फायदाच झाला' असंही राऊत यावेळी म्हणाले.
विधानसभेच्या निकाला युतीच्या बाजूने लागला. युतीला यात 161 जागा मिळाल्या. परंतु फिफ्टी फिफ्टीच्या फाॅर्म्युल्याची बाेलणी फिस्कटल्याने भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने ठाम भूमिका घेत खाेटं बाेलणाऱ्या भाजपसाेबत जायचे नाही असे जाहीर केले. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन करुन शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले.