बुग्जे बुग्जे (प. बंगाल) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यात बुधवारी कडाक्याचे वाग्युद्ध जुंपले. एकाने दुसर्यावर शरसंधान करावे व दुसर्याने लगेच पुढच्या सभेत त्याचा पलटवार करावा, असे दोन्ही नेत्यांच्या रात्री उशिरापर्यंत झालेल्या प्रत्येकी तीन प्रचारसभांमध्ये पाहायला मिळाले. गेले काही दिवस मोदींविरुद्ध सुरु केलेली जोरदार हल्लेबाजी बुग्जे बुग्जे येथील सभेतही सुरुच ठेवताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ज्यांनी दंगली घडवून आणल्या त्यांना पंतप्रधान होण्याचा काहीही अधिकार नाही. मोदींना अटक करण्याचीही त्यांनी मागणी केली. अल्पसंख्य समाजाचे प्राबल्य असलेल्या बुग्जे बुग्जे, मेतियाबुर्ज आणि बेहासातील चौराष्ट्र येथे ममतादीदींनी मोदींमवर चौफेर हल्ला चढविला. ममता बॅनर्जी यांच्या आपल्याला अटक करण्याच्या मनसुब्याची लगेच खिल्ली उडवीत मोदी म्हणाले, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांना मला तुरुंगात पाठवायचेच असेल तर त्यासाठी दोर खरेदीसाठी निविदा मागविण्यावर खर्च करम्याची तसदीही त्यांनी घेऊ नये. कुठल्या तुरुंगात जायचेय ते त्यांनी फक्त सांगावे, मी स्वत:हून तेथे जाईन! मी इथेच आहे.तुरुंगात गेल्यावर सर्वप्रथम बंगाली शिकण्याचे काम करीन. मोदींनी आपले वक्तव्य हसण्यावारी नेल्याचे दिसल्यानंतर पुढच्या सभेत ममता बॅनर्जी म्हणाल्या, ते एवढे बोलल्यावर त्यांना तुरंगात टाकणे तेवढे सोपे नाही. केंद्र सरकार माझ्या हातात असते तर मी मोदींच्या मुसक्या आवळून त्यांना रस्त्यातून फरफटत नेले असते! दंगली घडविणार्यास पंतप्रधानपदावर बसण्याचा हक्क नाही, अशी डरकाळी फोडत ममता म्हणाल्या, त्यांना तशी संधी मिळेल की नाही यावर आव्हान स्वीकारायला मी तयार आहे. पण मी सांगते की त्यांना ती संधी कधीच मिळणार नाही. काही काळजी करू नका. काही पैसेवाले मोदींना पंतप्रधानपदासाठी गॅस भरलेल्या फुग्यासारखे फुगवीत आहेत. १६ मे रोजी तो गॅसचा फुगा फुटेल व मतपेट्या उघडतील तेव्हा त्यात फक्त दोन फुलेच (तृणमूलचे निवडणूक चिन्ह) दिसतील. याला कृष्णनगर येथील सभेत प्रत्युत्तर देताना मोदी म्हणाले की, बांगलादेशातून येणार्या घुसखोरांचा मुद्दा ममतादींनी स्वत:च २००५ मध्ये उपस्थित केला होता. आता तो मी हाती घेतला म्हणून त्या माझ्यावर रागवलेल्या दिसतात. पण खरे तर तुमचे (श्रोत्यांचे) माझ्यावरचे वाढते प्रेम पाहून त्यांचा पारा चढला आहे. त्या माझ्याबद्दल काय बोलतात ते (बंगाली येत नसल्याने) मला कळत नाही. पण दीदी तुमचा प्रत्येक शब्द हा माझ्यासाठी आशिर्वादच आहे! (वृत्तसंस्था)
मोदी गाढव आहेत!
बांगलादेशी घुसखोरांवरून मोदींवर आसूड ओढताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, मोदींच्या मते बांगलादेशातून आलेले सर्वच घुसखोर आहेत. हे ठरविणारे ते कोण? असे विधान करण्याएवढी हिम्मत त्यांच्यात आली तरी कुठून? आता ते मतुआ जमातीबद्दल बोलतात व हे लोक भारताचे नागरिक नसल्याचे सांगतात. ते गाढव आहेत. बंगालचा कोणी अपमान केल्यास मी खपवून घेणार नाही.