नवी मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती असताना राज्य शासनाच्या माध्यमातून एमपीएससीच्या परीक्षा घेण्यासाठी घाई केली जात असून, समाजातील तरुणांचे मोठे नुकसान होणार आहे.कोरोनाच्या परिस्थितीमुळे परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना धोका आहे. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा राज्य शासनाने पुढे ढकलाव्यात. अन्यथा सकल मराठा समाजाच्या माध्यमातून परीक्षा होऊ देणार नसल्याचा इशारा खासदार संभाजी राजे यांनी दिला.माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी बुधवारी तुर्भे येथील एपीएमसीतील माथाडी भवन येथे सकल मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी खासदार संभाजी राजे बोलत होते. मराठा समाजाची जबाबदारी घ्या. काही धोका झाल्यास तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा खासदार संभाजी राजे यांनी राज्य सरकारला दिला. या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाच्या संघटनांचे समन्वयक राज्यभरातून सहभागी झाले होते. या वेळी माजी आमदार नरेंद्र पाटील, दिलीप जगताप, अंकुश कदम, आदी सर्वच जिल्ह्यांतील समन्वयक उपस्थित होते.‘सरसकट वयोमर्यादा वाढवा’मराठा आरक्षणाच्या निर्णयाला मिळालेली स्थगिती आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एमपीएससीच्या परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलाव्यात. यामुळे वयाच्या अटीचा प्रश्न निर्माण होईल; या परीक्षेसाठी सर्वांची सरसकट वयोमर्यादा वाढवा. आमचा कोणताही विरोध नसल्याचे खासदार संभाजी राजे यांनी सांगितले.
एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा...; खासदार संभाजी राजेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 4:11 AM