जालना: राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. रविवारी उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांनी सरकारला चर्चेसाठी दारं खुली केली आहेत. दोन दिवस मी बोलू शकतो, त्यामुळे दोन दिवसात काय बोलायचे ते बोला. माझे हृदय बंद पडले तर सरकारचे हृदय बंद पडलेच म्हणून समजा, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला आरक्षण द्यायचे नसेल तर मराठ्यांचा सामना करावा लागेल. कुणाचातरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचे कल्याण होणार नाही. मला काही होणार नाही. आंदोलन थांबणार नाही. माझ्या हृदयावर आणि किडनीवर परिणाम होईल, असे डॉक्टर म्हणत असले तरी होऊ द्यायचा नसेल तर सरकारने ताबडतोब आरक्षण द्यावे. माझे हृदय बंद पडले तर सरकारचे हृदय बंद पडलेच म्हणून समजा. मला काहीही झाले तरी मराठा समाज आंदोलन करणारच आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, चर्चेला येऊ देत नाहीत असं कारण देत सरकार आरक्षण देणार नाही. त्यामुळे दोन दिवस चर्चेसाठी मी तयार आहे. त्यानंतर मला बोलता येणार नाही. माझी बोलती बंद झाल्यावर रट्टे खाण्यासाठी येणार का? तुमचे कोण मातब्बर आहेत, त्यांना घेऊन या. मराठा समाज तुम्हाला काहीच बोलणार नाही. उलट तुम्हाला संरक्षण देईल. तुम्ही आज उद्या या. आज उद्या मला शंभर टक्के चांगलं बोलता येऊ शकतं हे माझं शरीर मला सांगतं. छत्रपतींच्या पायाला हात लावला की मला दोन चार तास ऊर्जा मिळते, असेही मनोज जरांगे म्हणाले.
याचबरोबर, सर्वांना वाटतं मला काही होणार नाही. पण कुणाला तरी जीवाला जपून चालणार नाही. एकाला तरी जीव धोक्यात घालावा लागणार आहे. तेव्हा सर्व समाजाचं कल्याण होणार आहे. आपल्याला दुखही झाले नाही पाहिजे आणि न्यायही मिळाला पाहिजे असे होत नाही. त्यामुळे कुणाला तरी दुख भोगावे लागेल. तेव्हा सगळ्यांना न्याय मिळणार आहे. तुम्ही म्हणता सरकार लक्ष देत नाही. हा फक्त दुसरा टप्पा आहे. तुम्ही थोडं थांबा तुमच्या सर्व लक्षात येणार आहे. शेवटी त्यांना आरक्षण द्यावंच लागणार आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणावरून राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक भागांत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी सकाळी १० वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार आहे.