गरज भासल्यास अजित पवारांना रुग्णालयात दाखल करावं लागेल; डॉक्टरांची महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 01:21 PM2023-11-01T13:21:35+5:302023-11-01T13:22:13+5:30
अजित पवारांना विश्रांतीची गरज आहे. तब्येत ठीक केवळ सांगण्यापुरते आहे. त्यांना अशक्तपणा खूप आहे.
मुंबई – राज्यात सध्या मराठा आरक्षणामुळे वातावरण पेटलं आहे. मराठा आंदोलक आक्रमक होत राजकीय नेत्यांना लक्ष करत आहेत. अशावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत खालावली असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे. अजित पवारांना डेंग्यु झालाय अशी माहिती पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी दिली होती. त्यानंतर आता अजित पवारांवर उपचार करणारे डॉ. संजय कपोटे यांनी महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली आहे.
डॉ. संजय कपोटे म्हणाले की, गेल्या ४-५ दिवसांपासून अजित पवारांना डेंग्यू झाला आहे. NS1 पॉझिटिव्ह असल्याने त्यांना आजही १०१ से. ताप आहे. अजित पवारांच्या प्लेट्सरेट दिवसेंदिवस कमी होत आहेत. आधी १ लाख ६० हजार होते, आता मंगळवारी रात्री ते ८० हजारांवर आलेत. शरीरातील पांढऱ्या पेशीही कमी झाल्या आहेत. बुधवारी म्हणजे आज अजित पवारांची वैद्यकीय चाचणी करून त्यात काही विशेष आढळले तर अजित पवारांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं.
तर सध्या आम्ही घरीच अजित पवारांना सलाईन दिले आहे. औषधोपचार सुरू आहेत. परंतु अजित पवारांना थकवा आलाय. अशक्तपणा प्रचंड वाढला आहे. अजित पवारांना विश्रांतीची गरज आहे. तब्येत ठीक केवळ सांगण्यापुरते आहे. त्यांना अशक्तपणा खूप आहे. कोविडमुळे आणि इतर व्हायरसमुळे आलेला अशक्तपणा जायला कधी कधी महिनाही लागतो. सध्या विकनेस खूप आहे. त्यात अजित पवारांना १०१ से. ताप आहे असंही डॉ. संजय कपोटे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाची परिस्थिती चिघळली असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती प्रखरतेने जाणवत आहेत. त्यातच विरोधी पक्षातील नेत्यांनी अजित पवारांना राजकीय आजार झाला असल्याची टीका केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, एक उपमुख्यमंत्री प्रचाराला दुसऱ्या राज्यात जातात तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना राजकीय डेंग्यू झाला आहे. ते या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना कोणता मच्छर चावला आणि डेंग्यू झाला हा तपासाचा भाग आहे. मोक्याच्या क्षणी त्यांना मच्छर चावला आणि डेंग्यू झाला, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.