Devendra Fadnavis Sharad Pawar Uddhav Thackeray: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही महिन्यांनी ही निवडणूक होत असल्याने निकालाबद्दल उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीत कोणाला बहुमत मिळणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. निकालानंतर नवीन राजकीय समीकरणंही बघायला मिळू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीये. याच चर्चेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एनडीटीव्ही वृत्तवाहिनीवर मुलाखत झाली. या मुलाखतीत निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांची मदत घेणार की, उद्धव ठाकरेंची? असा प्रश्न विचारण्यात आला.
फडणवीसांनी काय दिले उत्तर?
या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "निवडणुकीनंतर फक्त एकनाथराव शिंदेंची, अजित पवारांची, रामदास आठवले यांचीच मदत घेणार. यांच्याच मदतीने महायुतीचे सरकार तयार होणार."
भाजपने विद्यमान आमदारांची तिकिटं कोणत्या निकषावर कापली?
"आम्ही यावेळी एक वेगळ्या प्रकारे... तीन-चार पद्धतीचा अभ्यास करून जे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या अँटिइन्कबन्सीचं मिटर तयार केलं होतं. मिटरमध्ये जे लोक ५० टक्क्यांच्या खाली आहेत, त्यांना आपण जागा द्यायची नाही. जे ५० टक्क्यांच्या वर आहेत, त्यांना जागा द्यायची असं ठरवलं. त्यातून जे ५० टक्क्यांच्या वर आहेत, त्यांना आम्ही जागा दिलेल्या आहेत. काही लोक ५० टक्क्यांच्या खाली आम्हाला दिसत आहेत, त्यांना आम्ही तिकीट देत नाहीये", असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.