शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर...; तानाजी सावंतांची अजित पवारांसमोर नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 10:12 PM2024-04-19T22:12:57+5:302024-04-19T22:17:27+5:30
धाराशिव हा मतदारसंघ शिवसेनेचा होता, शिवसेनाचा खासदार निवडून येत होता. यावरून तानाजी सावंत यांनी परखडपणे भुमिका मांडली आहे.
जागावाटपावरून महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे. आज धाराशिव मतदारसंघात अर्चना पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्याने शिवसेनेत नाराजी आहे. हीच नाराजी आज सभेदरम्यान बाहेर पडली आहे. शिंदे सरकारचे मंत्री तानाजी सावंत यांनी भर मंचावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा इशारा दिला आहे.
धाराशिव हा मतदारसंघ शिवसेनेचा होता, शिवसेनाचा खासदार निवडून येत होता. यावरून तानाजी सावंत यांनी परखडपणे भुमिका मांडली आहे. धनंजय सावंत यांनी २६ जानेवारीलाच प्रचार सुरु केला आहे. हा मतदारसंघ कडवट शिवसैनिकांचा आहे. ते तो बाणा कधीच सोडणार नाहीत. तरीही एकनाथ शिंदे यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडायचा निर्णय घेतला आहे. या प्रकारे शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर शिवसैनिक आणि मी स्वतः सहन करणार नाही, असा इशारा सावंत यांनी दिला आहे.
या मतदारसंघातून एकदाच राष्ट्रवादीचा खासदार निवडून गेला आहे. इतर वेळा शिवसेनाच जिंकली आहे. यामुळे हा शिवसैनिकांवर झालेला अन्याय आहे. तरीही मोदींना ४०० पार खासदार जिंकवायचे आहेत. यामुळे मी शिवसैनिकांना विनंती करतो की त्यांनी अर्चना पाटील यांना निवडून द्यावे, मी त्यांच्यासाठी छातीचा कोट करून उभा राहणार आहे, असे आश्वासन तानाजी सावंत यांनी दिले.
यावर अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यांची खंत बोलून दाखविली आहे, तरी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करावेत, असे पवार म्हणाले.