मविआ विरुद्ध महायुती अशी थेट लढत होण्याचे चित्र असताना राज्यात तिसरी आघाडी होऊ घातलेली आहे. वंचितचे प्रकाश आंबेडकर वेगवेगळ्या संघटना, पक्ष, मराठा आंदोलक आदींनी एकत्र घेऊन तिसरी मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीने भाव न दिल्याने वंचितबरोबरच राजू शेट्टीही नाराज आहेत. यामुळे याचा फटका मविआलाच जास्त बसण्याची शक्यता निर्माण झाली असून आमदार बबनराव लोणीकरांनी भाजपला देखील सावध केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात या देशाला महासत्ताक बनविण्यासाठी परभणी लोकसभेची जागा भाजपने लढवावी, अशी आग्रही मागणी लोणीकर यांनी केली आहे. भाजप या जिल्ह्यात शक्तीमान पक्ष आहे. भाजपचे 3 आमदार, 17 जिल्हापरिषद सदस्य आहेत, 65 पंचायत समिती सदस्य, 92 कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य या जिल्ह्यात आहेत. भाजपकडे प्रबळ असे उमेदवार आहेत. परभणीची जागा भाजपला जिंकवायची असेल तर कमळ चिन्हावर ही जागा लढवावी लागेल, असे लोणीकर म्हणाले आहेत.
गेली 35 वर्षे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमच्या छाताडावर बसली आहे. खासदार, आमदार उद्धव ठाकरेंचे आहेत. भाजपला संधी मिळाली तर हा पक्ष दोन लाखांच्या मतांनी येथे निवडून येईल. जर काही चुकीचा निर्णय झाला तर उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा आमच्या छाताडावर बसेल. यामुळे देवेंद्र फडणवीस व भाजपच्या इतर नेत्यांना निवेदने देऊन ही जागा भाजपला मिळावी, अशी विनंती केली आहे असे लोणीकर म्हणाले.