जळगाव- राज्यात उद्धव साहेबांच्या आदेशामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेची फळं चाखता येत आहेत. पण आज शिवसेनेलाच लाचारासारखी वागणूक मिळत आहे. गेल्या अडीच वर्षात केवळ अपमानच होत असेल तर साहेब विचार करायला हवा, अशी खदखद शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केली आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असतानाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आघाडी धर्माचं पालन केलं जात नसल्याची एक यादीच तानाजी सावंत यांनी यावेळी वाचून दाखवली.
"शिवसेना हा विस्थापितांचा गट आहे. त्याची रग आजमावण्याचा प्रयत्न कुणीच करू नये. पण गेल्या दोन वर्षांपासून सरकारमध्ये जे सुरू आहे ते आम्ही सगळं पाहतो आहे. शिवसेनेला कुठंतरी दुय्यम वागणूक मिळते हे सर्वांनाच माहित आहे. अर्थसंकल्पातूनही तेच सिद्ध झालं आहे. एक साधा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा मुश्रिफांकडे जाऊन दीड कोटींची कामं घेऊन येतो आणि आमच्या छाताडावर नाचतो", असं तानाजी सावंत म्हणाले.
"आम्ही फक्त आदेशाची वाट पाहातोय""आमच्यामुळे हे सत्तेत आले. आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटण्याचा प्रयत्न करता हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहातोय. आम्ही सहन करणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे. रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात आहे तोपर्यंत आम्ही वाट पाहू. आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. जोपर्यंत साहेबांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही शांत आहोत", असं तानाजी सावंत म्हणाले.
"काँग्रेस-राष्ट्रवादीचा ग्रामपंचायतीचा सदस्य देखील दीड-दोन कोटींची कामं आणतो मग आमच्या शिवसैनिकांनी करायचं काय? त्यांनी एक कोटीचं काम आणायचं आणि ४० लाख कमवायचे आणि शिवसैनिकानं फक्त शिवथाळी भोजन योजना चालवायची? शिवसैनिकांनी शिवथाळी भोजन चालवायचं. १० रुपयाला थाळी विकायचं आणि बिलासाठी तीन-तीन महिने थांबायचं. मग त्याच्यातनं ५ हजारासाठी वाट बघत बसायची हा फरक आहे. शिवसैनिकावरील अन्याय थांबला पाहिजे", असं तानाजी सावंत म्हणाले.