पंढरपूर : भाजप सरकारला मिळालेल्या पाच वर्षांच्या कालावधीत अनेक कामे मार्गी लागली आहेत. परंतु राज्यातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी कमी पडला. पुढील पाच वर्षांचा कालावधीही भाजप सरकारला मिळाल्यास सर्व कामे करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक पंढरपूर येथे आले होते. यादरम्यान विश्रामगृह येथे पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण त्यांच्या एकीमुळे मिळाले आहे. मी फक्त माझे कर्तव्य केले. विठुरायाची कृपा असल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळाले. यामुळे यंदाच्या वर्षी मला आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या महापूजेला येणे सोयीस्कर झाले. मराठा समाजाकडून याच पंढरीत माझा सत्कार करण्यात आला. मराठा व धनगर समाजाचे राहिलेले प्रश्नही सोडविणार आहे.यंदाच्या वर्षी योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यास व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास आयएमडी यांच्या सूचनेने कृत्रिीम पावसाचे प्रयोग सुरू करण्यात येतील. त्याबाबत आमची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मराठा समाजातर्फे शिवमुद्रा भेट- मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने पंढरीत त्यांचा सत्कार करून शिवमुद्रा भेट देण्यात आली. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शैला गोडसे, मोहन अनपट, पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, दीपक वाडदेकर, नगरसेवक विशाल मलपे, संतोष कवडे, सुधीर धुमाळ आदी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडची भूमिकामराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करणारे लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. हा सत्कार भाजपचे नेते घडवून आणत आहेत. त्यात मराठा आरक्षणासाठी लढा देणारे अनेक कार्यकर्ते सहभागी नाहीत, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे यांनी व्यक्त केली आहे.