पुणे : भारतीय सेना शक्तीशाली आहे, हे दाखविण्याची वेळ आली आहे. सेनेवर भारतवासियांनी विश्वास ठेवल्यास सैन्याला बळ मिळेल. मुंबई हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाले असते तर उरी व पठाणकोट हल्ले झाले नसते. स्ट्राईकने आपल्यावरील हल्ले पूर्णपणे थांबतीलच असे नाही. मात्र, आपली सेना शक्तीशाली आहे, हे दिसेल, असे मत सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांनी केले.समस्त हिंदू आघाडीतर्फे शिवप्रताप दिन बाजीराव रस्त्याजवळील नातूबाग मैदान येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात ‘हिंदवी स्वराज्यभूषण वीर जीवा महाले’ पुरस्काराने राजेंद्र्र निंभोरकर यांना गौरविण्यात आले. तसेच ‘हिंदुत्व शौर्य’ पुरस्काराने संजय शर्मा यांना आणि मुकेश पाटील, सचिन पाटील यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, मिलिंद एकबोटे, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, अॅड. मोहन डोंगरे, दीपक नागपुरे,तेजेंद्र कोंढरे, योगेश समेळ, संदीप महाराज पळसे, मनोज पवार, कृष्णाजी पाटील, संजय जढर, सचिन जामगे आदी उपस्थित होते. राजेंद्र निंभोरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकदा काळोख्या रात्री हल्ले करुन गड-किल्ले मिळविले. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकमध्ये देखील अमावस्येची किंवा काळोखी रात्र हीच आम्हा सैनिकांची मैत्रीण असते. भारतातील केवळ १५ लोकांनाच या हल्ल्याची पूर्वकल्पना होती. भारत सरकारने सैन्याला पूर्ण मुभा व साहित्य दिल्याने आम्ही सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करु शकलो, असे सांगताना त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे इतरही अनुभव सांगितले.पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले, भारतात इतिहासाचे लेखन नीट केले गेले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० झाली. मात्र, राष्ट्र म्हणून आज ओळख मिळू लागली आहे. काश्मिरमध्ये ३७०, ३५अ कलम काढल्यानंतर खºया अर्थाने देश एकत्र झाला. यापूर्वी देश एकत्रितपणे उभा राहिला असता, तर काश्मिरी हिंदू पंडितावर अन्याय झाला नसता. मोहन शेटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आपण करताना अयोध्या आंदोलनाला यश येऊन राम मंदिर निर्माण होणार याचा आनंद यंदाच्या शिवप्रताप दिनाच्या उत्सवात आहे. मात्र, प्रतापगडच्या पायथ्याशी आजही अफजलखानाची कबर आहे. त्यामुळे आता ही कबर काढून शिवप्रताप स्मारक उभारण्याकरीता आपण पुढे येऊ या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर रंगराव पाटील व सहकाºयांनी पोवाडा सादर केला. तर, तुकाराम चिंचणीकर यांनी शिवरायांची आरती सादर केली. सौरभ कर्डे यांनी अफजलखान वधाचा प्रसंग सांगितला. नंदकिशोर एकबोटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
...तर पठाणकोट आणि उरी झाले नसते : डॉ. राजेंद्र निंभोरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 11:52 AM
भारतीय सेना शक्तीशाली आहे, हे दाखविण्याची वेळ आली आहे..
ठळक मुद्देसमस्त हिंदू आघाडीतर्फे शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा भारतातील केवळ १५ लोकांनाच या हल्ल्याची पूर्वकल्पना