नवी दिल्ली : लोकसभेआधी राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, लोकसभेला सपाटून मार खाल्ल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच राहुल गांधी यांना त्यांच्या परंपरागत मतदारसंघ अमेठीमध्ये हार पत्करावी लागली होती. यावरून केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी बोचरी टीका केली आहे.
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. यामध्ये त्यानी महायुतीसोबत असल्याचे सांगताना 240 जागांवर युती जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. तसेच 288 पैकी 40 जागा आरपीआयला देण्याची मागणी नुकतीच केली होती. मात्र, युतीच्या जागावाटपात एवढ्या जागा आरपीआयला सुटण्याची चिन्हे नाहीत. तर एवढ्या जागा मिळून महायुतीतील घटकपक्षांनाही मिळणार नसल्याची स्थिती आहे. महायुतीची घोषणा अद्याप व्हायची असून आचारसंहिता लागू झाली आहे.
आज आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करताना मोदींवरही स्तुतीसुमने उधळली. पाच वर्षे चांगले काम करूनही काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जनतेनेच ठरवले आहे की मोदींना कोणीही दुसरा पर्याय नाही. जर राहुल गांधी काँग्रेस सांभाळू शकले नाहीत, तर देश कसा सांभाळणार? याची परिणीती अमेठीमध्ये हरण्यामध्ये झाली, असे आठवले म्हणाले.