ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - शिवसेना-भाजप युती ही कोणत्याही फॉर्म्यूलावर नसून ती केवळ हिंदुत्वावर आहे असे सांगतानाच महाराष्ट्रात भगवा फडकणार असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे असे रोखठोख प्रतिपादन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या निवडणूक विषेश कार्यक्रमात बोलत होते.
राज्यातील आगामी निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपा युती टिकावी ही शिवसेनेची इच्छा आहे. परंतू अनेक मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले असल्याने ते मतदारसंघ भाजपाला सोडता येणार नाही. उध्दव ठाकरे यांनी राज्याचा मुख्यमंत्री व्हावे अशी राज्यातील शिवसैनिकांची इच्छा आहे. राज्याचे व्हिजन डॉक्यूमेंट पूर्ण करायचे असेल तर उध्दव ठाकरे यांनी त्याचे नेतृत्व करायला हवे असे संजय राऊत म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी अनेक पक्षातील नेत्यांचे चांगले संबंध आहेत. शिवसेना-भाजप युती ही कोणत्याही फॉर्म्यूलावर नसून ती केवळ हिंदुत्वावर असल्याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली. शिवसेनाप्रूख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर जागावाटपावरून अशी परिस्थिती उद्भ्ावलीच नसती तसेच भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे असते तर आजच्यापेक्षा चित्र वेगळे पाहायला मिळाले असते असे संजय राऊत यांनी सांगितले.