ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी जर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर आपली लोकशाही कोसळून भारताची अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे वक्तव्य प्रसिद्ध दलित कार्यकर्ते व लेखत कांचा इलाय यांनी केले. एक इंग्रजी वृत्तपत्राच्या चर्चासत्रात ते बोलत होते.
' सरदार पटेल भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर देशाचा प्रवास वेगल्या पद्धतीने झाला असता, असे नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान म्हटले होते. पटेल पंतप्रधान असते, तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहूच दिली नसती, मनुस्मृतीच्या समर्थकांनी राज्यघटना लिहीली असती, कारण पटेल यांची हिंदु महासभेशी जवळीक होती. असे इलाय म्हणाले. पटेल यांच्या नेतृत्वाखाली आपलीही अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, लोकशाही कोसळली असती. पहिल्या १७ वर्षांतच भारताचा पाकिस्तान झाला असता, असे मत इलाय यांनी वक्त केले
दरम्यान भाजपाचे माजी नेते आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे प्रमुख सुधींद्र कुलकर्णी यांनीही इलाय यांच्या मताशी सहमती दर्शवली. सध्याची आव्हाने पाहता, त्यावर मार्ग काढण्यासाठी पटेल यांचा विशेष उपयोग नाही. आपल्याला पोलाद पुरुषाची गरज नसून देशास सर्वसमावेशक दृष्टिकोन असलेल्या सहृदयी नेत्याची सध्या गरज आहे, असे कुलकर्णी म्हणाले.
इलाय यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.