बीड - राजकारणात काका-पुतणे हे राजकारण नेहमीच रंगल्याचं दिसून आले. राजकीय वारसा न मिळाल्याने बरेच पुतणे काकांपासून दूर झाले. ठाकरे, पवार या घराण्यातही काका पुतण्याचा राजकीय वाद रंगलाच. मात्र बीड जिल्ह्यात सोळंके घराणं त्याला अपवाद ठरलं आहे. याठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या पुतण्याला राजकीय वारसदार बनवून राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी शरद पवारांनाही खोचक सल्ला दिला आहे.
आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, महाराष्ट्रात ज्याठिकाणी वाद आहेत त्याठिकाणी चुलत्यांनी थांबण्याची भूमिका घेतली पाहिजे. शरद पवारांनी आमच्यासमोर निवृत्तीचा निर्णय घेतला आणि तो २ दिवसांत फिरवला. ही दुर्दैवी घटना होती. त्यामुळे त्यांच्या घरात फूट झाली असावी. वडिलधारी म्हणून चुलत्यांनी भूमिका घेतली असती तर घर शाबूत राहिले असते. मी मागच्या निवडणूक प्रचारातच ही माझी शेवटची निवडणूक असं जाहीर केले होते. त्यामुळे मला ही भूमिका बदलायची नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्यांनी माझ्यासोबत प्रत्यक्ष काम केले आहे त्यांना अजूनही मी निवडणूक लढवावी अशी त्यांची भावना आहे. परंतु मी निवृत्तीचा निर्णय ५ वर्षापूर्वी घेतला आहे. मी घेतलेला निर्णय योग्य आहे हे माझं ठाम मत आहे. नवीन नेतृत्व, तरूण नेतृत्व पुढचे ५-२५ वर्ष मतदारसंघाला स्थिर नेतृत्व लाभावं असं मला वाटतं. त्याला लोकही पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे. तरुण मंडळी माझ्याशी जे संपर्क ठेवू शकत नव्हते. काहींना आदरयुक्त भीती असायची ते कदाचित नव्या नेतृत्वाला जोडले जातील असंही आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटलं.
दरम्यान, मी जरी निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला व्हायचं ठरवलं असलं तरी मी सक्रीय राहणार आहे. मी २०१४ ते २०१९ आमदार नव्हतो. तरी रात्रदिवस लोकांसाठी काम करत होतो. यापुढेही तसं करत राहीन. विधानसभेची निवडणूक महत्त्वाची नाही. पुढे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका आहे. त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत मला सहकार्य केले त्यांच्यासाठी मला काम करावेच लागणार आहे असंही आमदार प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केले.