शरद पवार जर देव आहेत, तर देवाच्या पाठीत खंजीर का खुपसला? संजय राऊतांचा अजित पवारांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 11:04 AM2023-08-17T11:04:59+5:302023-08-17T11:06:00+5:30
शरद पवारांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत अजित पवार गटाबाबत काहीशी कठोर भुमिका घेतल्याने पुन्हा एकदा मविआ गॅसवर असल्याचे चित्र आहे. यावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार गाठीभेटी होत असल्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेना आणि काँग्रेसने तर शरद पवारांशिवाय महाविकास आघाडी पुढे नेण्य़ासाठी बैठकही केली आहे. अशातच शरद पवारांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत अजित पवार गटाबाबत काहीशी कठोर भुमिका घेतल्याने पुन्हा एकदा मविआ गॅसवर असल्याचे चित्र आहे. यावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांनी जे काल परखडपणे भाष्य केलं आहे, त्या देशाच्या भावना आहेत. शरद पवारांनी चिंता व्यक्त केलेली की, जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडेल. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हयातीत त्यांचा पक्ष तोडण्यात आला आणि फुटलेल्या पक्षाला चिन्ह आणि नावाची मान्यता दिली. शरद पवारांच्या सोबत देखील हेच झाले आहे. देशाच्या संसदीय लोकशाहीची, निवडणूक आयोगाच्या भविष्याची आम्हाला चिंता वाटत आहे, असे राऊत म्हणाले.
जसा बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फुटलेल्या गटाकडून वापरला जातो, तसाच अजित पवार गटाकडून शरद पवारांचा वापरला जात आहे. त्यांना बाळासाहेबांचा विचार मान्य नाही. परंतु यापूर्वीही फुटून बाहेर गेलेल्या लोकांनी बाळासाहेबांचा फोटो वापरणं सुरू केलं तेव्हा देखील बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझे फोटो वापरू नका. तसेच आज शरद पवारांच्या बाजूने देखील लोक फुटून गेले आणि म्हणतात की, शरद पवार हे आमचे लोकनेते आहेत. हे कसं काय तुम्हाला शरद पवार कशाला हवेत? बाळासाहेब कशाला हवे आहेत? तुमच्यात धमक आणि हिम्मत नाही आहे का? असा सवाल राऊत यांनी विचारला.
शरद पवार जर देव आहेत, तर त्यांच्या पाठीत खंजीर का खुपसला? बाळासाहेबांची शिवसेना का तोडली? असा सवालही राऊत यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपाला केला. इंडिया अलायन्सची तयारी अत्यंत जोरात सुरू आहे. 31 तारखेला ही बैठक ग्रँड हयात मध्ये सुरू होईल. सत्तावीस नेत्यांना याची निमंत्रण केलेली आहे. पाच राज्यांचे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती राऊत य़ांनी दिली.