मुंबई : भाजपाशी निवडणूक युती तोडल्यानंतर शिवसेना आता राज्य सरकारमधून बाहेर पडेल का आणि तसे झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपाला पाठिंबा देऊन सरकार तारेल का याची जोरदार चर्चा शुक्रवारी राजकीय वर्तुळ तसेच सोशल मीडियामध्ये होती. भाजपाचे १२२, शिवसेनेचे ६३ असे दोन्ही मिळून १८५ इतके संख्याबळ आहे. काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत. उद्या शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर देवेंद्र फडणवीस सरकार अल्पमतात येईल. अशा वेळी सत्ता टिकवायची तर त्यांना काँग्रेस अर्थातच पाठिंबा देणार नाही. त्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नसेल. आघाडी सरकारच्या काळातील कथित भ्रष्टाचारावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर अनेक आरोप झाले. २०१४ ची निवडणूक राष्ट्रवादीच्या नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून भाजपाने लढविली होती. त्यामुळे उद्या सरकार वाचवायची वेळ आली तर राष्ट्रवादीच्या कुबड्या भाजपा घेईल का, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ही चर्चादेखील आहे की अचानक परिस्थिती उद्भवली तर राष्ट्रवादी भाजपाला बाहेरून पाठिंबा देऊन सरकार टिकवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्नेहपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर असा तर्क दिला जात आहे. तसेच पवार यांची प्रतिक्रिया सूचक होती. केंद्रीय अर्थसंकल्पांच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बोलविली होती. त्यावर शिवसेनेच्या खासदारांनी बहिष्कार टाकला. त्या ऐवजी अर्थसंकल्पाकडून सेनेच्या अपेक्षांचे एक पत्र खा.अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. (विशेष प्रतिनिधी) काडीमोड म्हणजे षड्यंत्र - विरोधकांची टीकाआगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची गर्जना करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतची २५ वर्षांची युती तोडली. मात्र, युतीचा हा काडीमोड ठरवून केलेले नाटक असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तर युतीबाहेर पडण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेना नेतृत्वात सत्तेत बाहेर पडण्याची धमक नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेने आधी केंद्र सरकार आणि राज्यातील सरकारमधून बाहेर पडावे, असे आव्हान काँग्रेसने दिले आहे. मात्र, ही बेगडी युती तुटल्याने काँग्रेसलाच फायदा होणार असून आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आमचा विजय सुकर झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. उद्धव ठाकरे म्हणाले की, आता युती करण्यासाठी कुणापुढे कटोरा घेऊन जाणार नाही, म्हणजे यापूर्वी उद्धव ठाकरे हे कटोरा घेऊन उभे होते हे स्पष्ट झाले असून शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे हे आमचे म्हणणे खरे असल्याचे सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले.निवडणुकीची गणिते जुळत नाहीत म्हणून स्वतंत्रपणे निवडणुका लढवायच्या आणि निवडणुकीनंतर भ्रष्टाचार करण्यासाठी पुन्हा एकत्र यायचे ही शिवसेना-भाजपाची कार्यपद्धती आहे. विधानसभा आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या युतीनाट्याचे प्रयोग राज्यातील जनतेने पाहिले आहेत. मुंबई महापालिकेत गेल्या २२ वर्षांत युतीने प्रचंड भ्रष्टाचार केला असून आता काडीमोड घेतल्याने तो झाकला जाणार नाही, असा दावाही अशोक चव्हाण यांनी केला. युती तोडण्याचे नाटक हे खूप मोठे षड्यंत्र असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजपा युती मुंबई महापालिकेत चांगला कारभार करण्यात अयशस्वी ठरली आहे. मुंबईकरांना मूलभूत सुविधाही पुरविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे मुंबईकर निराश झाले आहेत. युतीच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांपासून मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठीच हे नाटक रचण्यात आल्याची टीका निरुपम यांनी केली. आता वेगळे लढण्याची भाषा करणाऱ्या शिवसेना, भाजपाने निवडणुकीनंतर एकत्र येणार नसल्याचे जाहीर करावे. कल्याण डोंबिवलीत निवडणुकीनंतर जसे सत्तेसाठी पुन्हा एकत्र आलात तसे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये निवडणुकीनंतर एकत्र येणार नाही ना, याचा खुलासा करा, अन्यथा ती मतदारांची फसवणूक ठरेल, असे राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर म्हणाले.
शिवसेनेने पाठिंबा काढला तर...
By admin | Published: January 28, 2017 4:15 AM