पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात आज पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली. ही यात्रा ८०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. हा कमी प्रवास नाही. ४२ ते ४५ दिवसांचा हा प्रवास आहे. युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी आहे. तरुणांना आत्मविश्वास देणारी ही यात्रा आहे. इतकेच नव्हे तर गावागावांतील तरुणांना प्रोत्साहन देणारी यात्रा आहे. सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने यात्रा करणाऱ्या युवांकडे त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही. कोणी दुर्लक्ष केले तर त्याची जबरदस्त किंमत सरकारला द्यावी लागेल. त्यामुळे ही यात्रा अत्यंत महत्वाची आहे. अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचं कौतुक करत राज्य सरकारला इशारा दिला.
रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला युवकांनी मोठी गर्दी केली आहे. शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर जेसीबीमधून फुलांची उधळण करत युवकांनी जंगी स्वागत केले. पुण्यातील टिळक स्मारकाजवळ यात्रा पोहोचली तेव्हा टिळक स्मारक हॉलमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, समाजात जागृती करण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. या दिंडीतून युवा पिढीला प्रोत्साहन मिळेल. युवकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण मध्यस्थी करु. त्यासाठी सर्व मागण्या एकत्रित करा. मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला. बैठक बोलवू, त्यावेळी या मागण्यांबाबत विचारमंथन करण्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहू आणि मुख्यमंत्र्यांकडून मागण्याबाबत सकारात्मक उत्तर घेऊ असा विश्वास पवारांनी दिला.
त्याचसोबत राज्यात जे परिवर्तन व्हावे अशी तरुणांची इच्छा आहे. त्याची प्रक्रिया या तुमच्या युवा संघर्ष यात्रेतून पूर्ण होईल अशी माझी खात्री आहे. त्याची उत्तम सुरुवातही झाली आहे. तुम्ही मुद्दा उपस्थित केला आणि सरकारला कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घ्यावा लागला. असाच एकदा शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. आम्ही त्यावर सभागृहात आवाज उठला. पण प्रश्न सुटला नव्हता. म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जळगाव ते नागपूर अशी शेतकरी दिंडी काढली होती. आजची युवा संघर्ष यात्रा ही नव्या पिढीची दिंडी आहे. नव्या पिढीला आत्मविश्वास देणारी, प्रोत्साहन देणारी आहे असंही पवारांनी म्हटलं.
दरम्यान, विधिमंडळ ही लोकशाहीची पंढरी असते. या पंढरीचे दर्शन घडावे आणि आम्हाला तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता यावेत, हे आम्ही ठरवले आणि जळगावपासून लातूरपर्यंत दिंडी काढली, संबंध प्रवासात काळ्या आईची सेवा करणाऱ्यांनी आमचे स्वागत केले. जेवणापासून रात्रीच्या विश्रांतीपर्यंत कशाचीही कमी पडली नाही. आपल्या गावात दिंडी येणार म्हणून त्या गावातील भगिनीच आमच्या दिंडीची सोय करत होत्या. एवढ्या मोठ्या प्रवासात कुठेही अन्नधान्याची व्यवस्था करावी लागली नाही. आज त्यापेक्षाही मोठी दिंडी आहे असंही शरद पवारांनी सांगितले.
सरकारी धोरणं अशी का?
ही यात्रा अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने असे निर्णय का घेतले, सरकारची धोरणे अशी का आहे, हे समजत नाही शाळा चालू पण शिक्षक नाही, बेरोजगारांची संख्या वाढत आहे. शैक्षणिक संस्था चालतात पण भरमसाठ फी घेतात. शिक्षक आणि प्राध्यापकांची पदे भरली पाहिजेत. एमपीएसच्या माध्यमातूनच भरती झाल्या पाहिजेत.सभाजीनगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, याठिकाणी आयटी क्षेत्राचा विकास केला पाहिजे अशीही तरुणांची मागणी आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कच्या उभारणीची आठवणही उपस्थित तरुणांना शरद पवार यांनी सांगितली.