मुंबई : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला तहव्वूर राणाला भारताच्या हवाली करण्याची तयारी अमेरिकेने दाखवली आहे. हल्ल्यातील जखमी देविका नटवरलाल हिने न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. राणाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली तर आंनद होईल, अशी प्रतिक्रिया देविकाने दिली आहे.
मुंबईवर हल्ला झाला तेव्हा देविका नऊ वर्षांची होती. तेव्हा ती खटल्यातील सर्वात लहान प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. राणाला केवळ तुरुंगात न ठेवता त्याच्याकडून हल्ल्याविषयीची अधिकाधिक माहिती जमा करायला हवी, असे देविकाला वाटते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी देविका कुटुंबासह गावाला जायला निघाली होती. ट्रेन पकडण्यासाठी ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे आली होती. तेथे कसाब आणि त्याच्या साथीदाराने हल्ला केला. कसाबच्या एके-४७ मधील एक गोळी तिच्या उजव्या पायाला लागली.
देविका म्हणाली, राणाला भारतात आणणार असल्याचे समजले. त्याला फाशीची शिक्षा दिली तर मला अत्यंत आनंद होईल. त्याला अशा पद्धतीने शिक्षा दिली पाहिजे की, यापुढे कोणी आपल्या देशावर किंवा कुठेही दहशतवादी हल्ला करण्यास धजावणार नाही.