Ajit Pawar ( Marathi News ) : "जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं की इतके इतके आमदार आणल्यानंतर मुख्यमंत्री करतो, तेव्हा मलाच सांगितलं असतं तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो. जाऊद्या आता काय...शेवटी हा नशिबाचा भाग असतो," असं भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली. ते ठाणे येथे आयोजित ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते गडकरी रंगायतन सभागृह ठाणे येथे सायंकाळी झाले. या सोहळ्यात बोलताना अजित पवार यांनी आपल्या मिश्किल अंदाजात फटकेबाजी केल्याने उपस्थितांमध्ये हास्सकल्लोळ झाला.
अजित पवार म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांची आमदार म्हणून टर्म १९९९ ला सुरू झाली, तर एकनाथ शिंदे यांची २००० ला सुरुवात झाली. यांच्यात सर्वांत सिनियर मी आहे, माझी सुरुवात १९९० मध्ये झाली. तरी मी मागे राहिलो, मला जर संधी दिली असती तर मी पूर्ण पार्टी आणली असती. त्यांनी तर फक्त आमदारच आणले. आता वेळ निघून गेली. मी अनेक मुख्यमंत्री बघितले. परंतु इतका माणसात मिसळून काम करणारा मी नाही पाहिला. कधी कधी मीच वैतागतो ही कॅबिनेट आहे की काय..?," अशा शब्दांत अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले.
"राज्यपालांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा प्रथमच कार्यक्रम होत आहे. या ठाण्याच्या नगरीत खूप काही घडले आहे. त्यातून एका शेतकरी कुटुंबाचा मुलगा येतो, कामाला सुरुवात करतो, नगरसेवक होतो आणि त्यानंतर मागे वळून न पाहता काम करत राहतो. त्याची जिद्द होती चिकाटी होती. अनेक संकटे त्यांनी आतापर्यंत झेलली. पुस्तकात शिंदे यांचे गुरू बाळासाहेबांचा फोटो व दिघेंचा फोटो हवा होता असे माझे मत आहे. या पुस्तकात प्रेमळ आजोबा दिसला नाही, लेखकाने माझं मत, माझा सल्ला घ्यायला हवा होता," असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पद्मश्री शंकरबाबा पापळकर, तसेच निमंत्रित उपस्थित होते.