मुंबई – ज्या कामगार संघटनांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वाटोळे केले, एसटीला भ्रष्टाचाराच्या खाईत ओढली, अशा भ्रष्ट कामगार संघटनेसोबत सरकार चर्चा करते, परंतु ज्यांनी खऱ्या अर्थाने राज्यात एसटी वाचावी म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ लढा दिला त्या संघटनेसोबत सरकार बोलत नाही, हे खेदजनक बाब आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्यानंतर एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांनी एसटी संघटनांसोबत उद्या चर्चा करून समस्यांवर तोडगा काढण्याची भूमिका घेतली त्याबद्लल त्यांचे स्वागत करतो. परंतु एसटी कर्मचाऱ्याला योग्य न्याय मिळाला नाही तर दिवाळीनंतर महाराष्ट्रातील एसटीचे चाक जागेवर थांबल्याचे सरकारला दिसेल असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, गेल्या २ दिवसांपासून एसटी कर्मचारी आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल सरकारने घ्यावी अशी त्यांची भूमिका आहे. राज्यात जवळपास ९० हजार एसटी कर्मचारी आहेत. दिवाळीवर तोंडावर आली असताना अद्यापही बोनस नाही, किमान १५ हजार बोनस मिळावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत एसटीचे विलिनीकरण करा किंवा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सुरू करा ही पूर्वीपासून मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. यावर निर्णय होणे अत्यंत गरजेचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी १६ मागण्या राज्य सरकारपुढे ठेवल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार नियमित झाला पाहिजे, त्याची हमी सरकारने घेतली पाहिजे. मागील काळात पगार वाढ करण्यात आली, परंतु त्यात त्रुटी आहेत त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. सरकारने दोन बैठका घेतल्या, परंतु फक्त चर्चा होतात, चर्चेचे कागद गुंडाळून ठेवले जातात असं यावेळी होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेऊ आणि ही बाब उद्याच्या बैठकीत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निदर्शनास आणून देऊ असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.