लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : लग्नाला पोरगी पाहिजे असेल, तर पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी स्मार्ट हवी असेल, तर ती तुमच्या माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही, नोकरीवाल्यांना भेटते. दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते, ज्यांचा पानठेला आहे, धंदा, किराणा दुकान आहे, अशा माणसांना दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटते. शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिले नाही, अशा वादग्रस्त विधानाचा जाहीर सभेतील एक व्हिडीओ बुधवारी आमदार देवेंद्र भुयार यांचा व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जन्माला येणारं जे लेकरू आहे, ते हे बाळ निघत राहते, तर माय इल्लू पिल्लू त्याच्यापोटी वानराचे पिल्लू असाच हा कार्यक्रम सगळा, असेही आमदार भुयार म्हणाले. त्यांच्या या विधानावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे.
महिला उपभोगाचे साधन आहे का? : यशोमती ठाकूरअजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावे, अशा प्रकारचे महिलांचे वर्गीकरण कोणीही खपवून घेणार नाही. तुम्हाला संसार आणि समाज धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.महिलांच्या मतासाठी तुम्ही जीवाचं रान करत आहे व दुसरीकडे महिलांचं वर्गीकरण करून महिलांचा अपमान करत आहे, त्यामुळे तुमची मानसिकता काय आहे, ते समजत आहे. महिला उपभोगाचे साधन आहेत का, अशी टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी केली.
मध्य प्रदेशात २०१९ मध्ये एका जाहीर कार्यक्रमात आयोजकांनी दिलेल्या ‘त्या’ विषयावर हे विधान आहे. या विधानाचा आता कोठेही संबंध नाही. महिलांचा अपमान किंवा टीका करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यावेळी पोरांना लग्नाची मुलगी मिळत नव्हती, म्हणून तेव्हाची वस्तुस्थिती मांडली. - देवेंद्र भुयार, आमदार वरुड-मोर्शी.
देवेंद्र भुयार यांचे वक्तव्य हे केवळ महिलांचे अपमान करणारे आहे असे नाही. हे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची टिंगल उडविण्यासारखे आहे. यांना वाटते की आम्ही काहीही बोललो तरी आम्हाला कुणी काहीही शिक्षा करू शकत नाही. या मस्तवालपणातून हे होत आहे.- सुषमा अंधारे, नेत्या, उद्धव सेना
आमदार भुयार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधच आहे. स्त्रीच्या रुपापेक्षा तिच्याच असलेली शक्ती ओळखायला हवी. तुमची भाषा कुठल्याही सभ्य समाजाला शोभणारी नाही. अशा पद्धतीची वक्तव्य आपण टाळली पाहिजेत, ज्यामुळे महायुतीची बदनामी होईल.- चित्रा वाघ, नेत्या, भाजप