जालन्याच्या अंतरावाली-सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. यावेळी आंदोलक तिथे मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. या आंदोलकांनी जरांगेंना पाणी प्या, अशा घोषणा करून आवाहन केले. यावर पाणी पिले तर आरक्षण कसे मिळणार, सरकारला एखादा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या, असे जरांगे पाटील म्हणाले.
न्यायाचा दिवस जवळ आला आहे. मला माझ्या समाजापेक्षा कोणी मोठे नाहीय, असे सांगत जरांगे पाटील भावूक झाले. यानंतर आंदोलकांनी पाणी प्या, पाणी प्या अशा घोषणा देत जरांगेंना पाणी पिण्याचे आवाहन केले. यावेळी जरांगे पाटील भावूक झाले व घोटभर पाणी पिण्यासाठी होकार दिला.
यानंतर बोलताना जरांगे पाटलांनी आपल्याला विखे पाटलांचा फोन आलेल्याचे सांगितले. ज्यांचे पुरावे मिळालेत त्यांनाच नाही तर सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण द्यावे, प्रमाणपत्र द्यावे. पुरावे असलेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार. मी आंदोलन थांबविणार नाही, असे विखे पाटलांना फोनवरून सांगितले, असे जरांगे पाटील म्हणाले.
प्रकाश सोळंके यापुढे सोसायटीतही निवडून येणार नाही. पोलिसांनी मराठा आंदोलकांना त्रास द्यायचा नाही. मराठा भरकटत नाहीय, आमचे आंदोलन शांततेत सुरु आहे, असे जरांगे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी वाचाळ नेत्यांना आवरावे. आमच्या वाटेला गेलात तर मराठे सोडणार नाहीत, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.