महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चेवर, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीनंतर, भारतीय जनता पक्ष युती अर्थात महायुती सत्तेवर आल्यास, देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करणार, अशी भविष्यवाणी जयंत पाटलांनी केली आहे. याच वेळी, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हे कधी सुट्टी देतील, हे सांगता येत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. ते पंढरपूर येथे पत्रकारांसोबत बोलत होते.
महायुतीतील मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेसंदर्भात भविष्यवाणी करताना जयंत पाटील म्हणाले, "महायुती सत्तेत अल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार. हे अमित शाह यांनी दहा वेळा सांगितले आहे. निवडणुकीनंतर, भारतीय जनता पक्ष युती निवडून आल्यावर, देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा त्यांचा इरादा आहे."
याच वेळी, "एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना हे कधी सुट्टी देतील हे सांगता येत नाही. शेवटी मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांनाच करायचे, हाच भारतीय जनता पक्षाचा ठाम निर्धार आहे. नाहीतर, अमित शहा हे दोन दोन, तीन तीन वेळा यासंदर्भात बोललेच नसते." असेही जयंत पाटील म्हणाले.
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी ही नावंही चर्चेत -राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? यावर चर्चा सुरू असताना आता केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच नाही तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची नावेही समोर आली आहेत.
यातच, भाजपा नेते विनोद तावडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे केवळ देवेंद्र फडणवीसच नाही तर अन्य काही चेहरेदेखील आहेत, असे म्हटले होते. यानंतर आता स्वत: देवेंद्र फडणवीस यांनीही ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाहीत, असे म्हटले आहे.