'नॅशनल हेराल्ड प्रकरणी व्यवहारच झाला नाही तर घोटाळ्याचा आरोप कसला?', काँग्रेसचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:43 PM2022-06-13T17:43:49+5:302022-06-13T17:44:52+5:30

Congress Criticize Devendra Fadanvis: नॅशनल हेराल्ड प्रकरणात २ हजार कोटी रुपयांच घोटाळा झाला हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप हास्यास्पद व धादांत खोटा आहे. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

If the National Herald case was not dealt with, then who is accused of scam ?, Congress questions Fadnavis | 'नॅशनल हेराल्ड प्रकरणी व्यवहारच झाला नाही तर घोटाळ्याचा आरोप कसला?', काँग्रेसचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

'नॅशनल हेराल्ड प्रकरणी व्यवहारच झाला नाही तर घोटाळ्याचा आरोप कसला?', काँग्रेसचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

Next

मुंबई - नॅशनल हेराल्ड प्रकरणात २ हजार कोटी रुपयांच घोटाळा झाला हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप हास्यास्पद व धादांत खोटा आहे. ज्याचा काही व्यवहारच झाला नाही, कोणालाही लाभांश मिळालेला नाही त्याची चौकशी कसली केली जाते व कोणत्या न्यायालयाचे दाखले देता असा सवाल उपस्थित करत गांधी कुटुंबाला ईडीची पाठवलेली नोटीस ही केवळ राजकीय सूडबुद्धीने पाठवलेली आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

अतुल लोंढे म्हणाले की, नॅशनल हेराल्ड प्रकरणी केंद्रातील भाजपाचे नेते ५ हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप करत आहे तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस २ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत आहेत. आधी फडणवीस यांनी दिल्लीच्या नेत्यांशी चर्चा करून कपोलकल्पित घोटाळ्याचा आकडा निश्चित करावा. खोटे बोलले व वारंवार खोटे बोलल्याने सत्य कधी लपत नसते. भाजपा व आरएसएसच्या लोकांना खोटे बोलण्याची शिकवणच दिलेली असते त्यामुळे फडणवीस यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. नॅशनल हेराल्डला काँग्रेस पक्षाने २००२ ते २०११ दरम्यान ९० कोटी रुपये १०० हप्त्यात कर्जाने दिले आणि अशा प्रकारे कर्ज देणे कोणत्याही कायद्याखाली बेकायदेशीर नाही. हे कर्ज नॅशनल हेराल्ड परत करणे शक्य नसल्याने असोशिएटेड जनरल लिमिटेडने ते इक्विटी शेअरमध्ये परावर्तित केले आणि हे शेअर ‘यंग इंडिया’ या ‘नॉट फॉर प्रॉफिट’ कंपनीला कलम २५ अंतर्गत हस्तांतरित करण्यात आले. हा सर्व व्यवहार पारदर्शी आहे, यात कसल्याही प्रकारच्या चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण झालेले नाही व कोणाला लाभही झालेला नसताना घोटाळ्याचा आरोप कसा ?

स्वातंत्र्य चळवळीत इंग्रजांच्या बाजूने असणाऱ्या भारतीय जनता पक्ष व पितृसंस्था आरएसएसला स्वातंत्र्यसैनिकांचे नाव घेण्याचा कसलाही अधिकार नाही. केंद्रातील भाजपाचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारीचा दर ९ टक्यांच्यावर गेला आहे, कर्जाचा डोंगर झाला आहे, रुपयाची घसरण सुरुच आहे, अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे, यावर भाजपाकडे उत्तर नाही म्हणून त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी विरोधकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

राहुल गांधी व काँग्रेस व्हिक्टिम कार्ड खेळत आहे या आरोपाची खिल्ली उडवत लोंढे म्हणाले की, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली जात असताना भाडोत्री लोकं जमवून तुम्ही काय केले होते ?  गर्दी कशाला जमवली होती ? दरेकर व भाजपाच्या ज्या लोकांवर घोटाळ्याचे आरोप झालेत त्यांनीही चौकशीला सामोरे जावे उगाच कांगावा कशाला करता? असा उलटा प्रश्नही विचारला आहे.

Web Title: If the National Herald case was not dealt with, then who is accused of scam ?, Congress questions Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.