भाजपा कोअर कमिटी : अमित शहांचा राज्यातील नेत्यांना सवाल
संदीप प्रधान - मुंबई
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने गेल्या 15 वर्षात 11 लाख 88 हजार कोटी रुपयांचे घोटाळे केल्याची यादी भाजपाच्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कोअर कमिटीच्या बैठकीत सादर केली खरी, पण अशा घोटाळेबाज नेत्यांच्या विरोधात प्रत्येक मतदारसंघात तुम्ही काय केले, किती संघर्ष यात्रा काढल्या, कोणती आंदोलने केली, अशी उलटतपासणी शहा यांनी केली. लोकसभा निवडणूक निकालातील यशामुळे आलेली सुस्ती आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आलेले शैथिल्य यातून तत्काळ बाहेर पडण्याची सूचनाही त्यांनी केली. केवळ मोदी लाटेवर अवलंबून राहू नका असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सत्ताधा:यांनी आदर्श घोटाळ्यापासून अगदी दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या शेणाचा घोटाळा करण्यार्पयत अनेक घोटाळे केले असल्याची जंत्री भाजपा नेत्यांनी पक्षाध्यक्ष शहा यांना सादर केली. घोटाळ्याची ही रक्कम बरीच मोठी असल्याचे निदर्शनास आणले. त्यावर शहा म्हणाले की, सरकारचे घोटाळे गंभीर आहेत. मात्र त्याच्या विरोधात तुम्ही काय केले? पंकजा मुंडे यांच्या सध्या सुरू असलेल्या संघर्ष यात्रेचा उल्लेख करून घोटाळे करणा:या मंत्री व नेत्यांच्या मतदारसंघात असे काही आंदोलन करून लोकांपर्यंत हे घोटाळे पोहोचवले का? केवळ दूरचित्रवाहिनीला मुलाखती देऊन आणि टीका करून तुमची जबाबदारी संपत नाही. गेल्या काही दिवसांत कोणते कार्यक्रम हाती घेतले, असा जाब विचारला.
माथूर करणार सेनेसोबत चर्चा
शिवसेनेबरोबर जागावाटपाची चर्चा करण्याकरिता ओम माथूर यांना शहा यांनी नियुक्त केले आहे. निवडणूक घोषित झाल्यावर किमान पंधरा दिवस आपला मुक्काम महाराष्ट्रात राहील, असेही शहा यांनी स्पष्ट केले आहे. शहा यांच्या मुंबई दौ:यानंतर आता भाजपाचा कार्यकर्ता सक्रिय होईल, असा विश्वास एका नेत्याने व्यक्त केला.
महाराष्ट्रात अनुकूल वातावरण असले तरी लोकसभा निवडणूक निकालानंतर येथील भाजपा कार्यकर्ता सध्या हवेत आहे. शिवाय सरकारविरोधात संघर्ष करणारा गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नेता गमावल्याने काही कार्यकर्ते अजून शोकाकुल आहेत. असेच वातावरण राहिले तर अनुकूल वातावरण असूनही अपेक्षित यश लाभणार नाही, असा सावधानतेचा इशाराही शहा यांनी दिला.