मंगळवारी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपचे नेते रावसाहेब दानवे याची भेट घेतली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देणार का नाही याबाबत स्पष्टीकरण दिलं. तसंच संकट येत असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करतो असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
“गेली चाळीस वर्ष दानवे आणि मी एकत्र काम केलं आहे. जिल्हा आम्ही समर्थपणे सांभाळला आहे. काही कटुता मध्ये आली. आज त्यांनी मला चहाचं निमंत्रण दिलं होतं. जायचं का नाही हे मला माझं ठरवू द्या, निर्णय झाला की मी तुम्हाला सांगेन,” असं खोतकर शिंदे गटात सहभागी होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले. त्यांनी दानवे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
“फोटोमध्ये मी बाजूला होतो. सहज भेट घेण्यासाठी गेलो होतो. शिंदेंसोबत जायचं का नाही यासंदर्भातील भूमिका जालन्यात गेल्यावर स्पष्ट करू,” असेही ते म्हणाले. काल आमची योगायोगानं एकनाथ शिंदे यांची भेट झाली, तेव्हाच दानवेंचीही भेट झाली. त्यानंतर त्यांनी चहा नाश्त्याचं निमंत्रण दिलं. याचे काही फार वेगळे अर्थ घेऊ नका, असे खोतकर म्हणाले. एबीपी माझाशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
मी का दिल्लीत आहे तुम्ही काढू शकता आणि कदाचित तोच तणाव माझ्या चेहऱ्यावर आहे. अशाप्रकारचं संकट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल. कुटुंबाचा तणाव असतो, सर्वांचा प्रकारचा तणाव असतो, नाही त्या गोष्टीत अडचणी निर्माण केल्या जातात. कधी निर्णय जाहीर करू हे लवकर सांगेन, असंही त्यांनी सांगितलं.