मुंबई – गेल्या ४ वर्षापासून राज्याच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी घडत आहेत. त्यात मध्यंतरीच्या काळात ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या. राज्यातील विविध शहरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी साद घातली होती. त्यानंतर माध्यमांमध्ये मनसे-ठाकरे गट युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली. या सर्व चर्चेवर उद्धव ठाकरेंनी अखेर मौन सोडले. संजय राऊतांनी मनसेसोबतच्या युतीच्या चर्चेवर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता.
दोन भाऊ एकत्र येतील का? या चर्चेला कुठे आधार आहे का? त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आधार असता तर चर्चा थांबलीच नसती ना. आपणच म्हणालात चर्चा झाली आणि चर्चा थांबली. ज्याने कुणी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असेल त्याला आधार मिळाला नाही म्हणून चर्चा थांबली असेल असं त्यांनी म्हटलं. तर असा एखादा चर्चेचा प्रस्ताव आला तर काय कराल? असा प्रतिसवाल संजय राऊतांनी मुलाखतीत उद्धव ठाकरेंना केला.
त्यावर मी आला तर...गेला तर...याच्यावर कधी विचार करत नाही. गेला तरी विचार करत नाही. आला तरी विचार करत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा विचार करतो. त्याच्यामुळे आता तरी अशी काही चर्चा नाही. त्यामुळे असं बोलण्याचीही काही आवश्यकता नाही असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीच्या चर्चांवर केले आहे.
महाविकास आघाडीचं भवितव्य काय?
संपूर्ण देशाला आश्चर्य वाटेल असा महाविकास आघाडीचा प्रयोग ३ वर्षापूर्वी झाला. त्यात ३ भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आले आणि सरकार बनले. आता ते सरकार गेले असले तरीही महाविकास आघाडी आजही आहे काय? असा सवाल संजय राऊतांनी ठाकरेंना केला. त्यावर नक्कीच आहे. याउलट महाविकास आघाडीची व्याप्ती आता वाढलेली आहे. त्याचंचे रुपांतर आता देशभरात इंडिया नावाने झालंय म्हणून इतर राज्यातले जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यात काँग्रेस मोठा पक्ष आहेच. इतर सर्व पक्ष त्यात सामील झालेत. कारण आता ही लढाई केवळ कोणत्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वाची नाही, देशाच्या लोकशाहीची आणि देशाच्या स्वातंत्र्याची आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
त्याचसोबत प्रकाश आंबेडकरांना मी तुमच्या मनात नेमकं काय आहे? काहीतरी प्रस्ताव, त्याचा मला अंदाज येऊ द्या. तसा प्रस्ताव तुम्ही मला दिल्यानंतर महाविकास आघाडीत चर्चा करू. आता समीकरणे बदलली आहेत. त्यावेळचे वातावरण आणि आताचे वातावरण वेगळे आहे. पुन्हा सगळ्यांशी बोलून त्यांचा प्रस्ताव काय आहे, आपण काय करू शकतो? अजूनही जागावाटप कुठेच कोणाचेही झालेले नाही. पण तो प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावर चर्चा होईल. प्रकाश आंबेडकर सोबत राहतील असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.