लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि.जालना) : मुंबई येथे आमरण उपोषण करणार असून, २६ जानेवारीपासून प्रत्यक्षात उपोषणाला सुरुवात होईल. २० जानेवारीलाच अंतरवाली सराटी येथून सर्व जण निघणार असून, पाच ते सहा दिवसांत मुंबईला पोहोचू. यासाठी दहा ते पंधरा दिवसांत नियोजन केले जाईल. मुंबईत जवळपास तीन कोटी समाजबांधव व दहा लाख गाड्या जाणार असल्याचा दावा मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केला.
ते म्हणाले की, २० जानेवारीपर्यंत मार्ग निघत असल्यास चर्चेला हरकत नाही. क्युरिटिव्ह पिटीशन न्यायालयाने दाखल करून घेतल्याने तोही मराठा समाजबांधवांचा विजय आहे. क्युरिटिव्ह पिटीशनला आम्ही नाकारलेलेच नाही.
उपोषणाचा निर्णय घेऊ नये : देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गांभीर्याने काम करीत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचेही काम वेगाने सुरू आहे. शिंदे समितीचा तिसरा अहवालही लवकरच प्राप्त होईल. ओबीसी समाजाला त्रास, अन्याय होणार नाही याची काळजी घेऊनच सरकार कार्यवाही करीत आहे. ही सकारात्मक बघता मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईत रविवारी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे, तिसरा अहवालही अपेक्षित आहे. त्यात निजामकालीन नोंदी हैदराबादहून प्राप्त करून घेत आहोत.