मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यंत्री अजित पवार आमनेसामने आले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून पक्षाच्या आठ आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत शरद पवार यांच्यावर जोरदार टीकाही केली होती. दरम्यान, शरद पवार यांनी कुटुंबाला कारवाईपासून वाचवण्यासाठी पक्षात फूट पाडण्याचे नाटक केले असल्याचा आरोप शरद पवार यांचे जुने सहकारी आणि विद्यमान भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट नाही तर हे ठरवून केले आहे, असा आरोप चंद्रराव तावरे यांनी केला आहे. शरद पवारांनी अनेक वेळा फोडाफोडीचे राजकारण केले. पण आता जे ते करत आहेत, ते जाणूनबुजून ठरवून कुटुंबाला वाचवण्यासाठी करत आहेत. तसेच, हे सगळं नाटक हे 2024 विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरु असणार आहे. तोपर्यंत सगळ्या चौकशीतून क्लीन चिट घ्यायची असा डाव त्यांचा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे भाजपसोबत 90 जागा लढवणार आणि शरद पवार यांच्या जागा एकत्र घेऊन विधानसभेत राष्ट्रवादीचे सरकार आणणार असल्याचे चंद्रराव तावरे म्हणाले. याशिवाय, सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीवेळी अजित पवार शांत बसून त्यांना मदत करणार असल्याचे चंद्रराव तावरे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील राजकारणात गेल्या 2 जुलैला मोठा भूकंप झाला. वर्षभरानंतर झालेल्या या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी अजित पवार होते. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत पक्षाच्या आठ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा नव्हे तर तीन वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता. तर, दुसरीकडे, शरद पवार यांनीही बैठक घेत अजित पवार यांना प्रत्त्युत्तर दिले होते. तसेच, कुणी गेले त्याची चिंता करू नका, गेले त्यांना तिथे सुखाने राहू द्या. त्याबद्दल आपली काहीच तक्रार नाही. आपण सामूहिक शक्तीतून नवीन कर्तृत्ववान नेतृत्वाची पिढी महाराष्ट्रात निर्माण करू, अशी साद शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना घातली होती.