मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झाले आहे. हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेने भाजपाशी युती करावी अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २५ हून अधिक आमदार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुढे काय करणार याची चर्चा सुरू झाली आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून काढण्यात आले आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
नारायण राणे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अडीच वर्षापूर्वी फसवणूक झाल्याचं ते कबुल करतात. वारंवार अपमानस्पद वागणूक एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. यातून शिंदे यांचा स्वाभिमान जागा झाला. त्यातून त्यांनी बंड केले. बाळासाहेबांनी शिवसेना पक्ष वाढवला, शिवसैनिकांवर प्रेम केले. पण पक्षप्रमुख, मुख्यमंत्री असूनही सहकाऱ्यांना विश्वास देता आला नाही. शिवसैनिकांना भेटीगाठी दिल्या नाहीत. मातोश्रीच्या बाहेर पडायचं नाही. त्यामुळे गुदमरलेल्या मंत्री, आमदारांनी त्यागाच्या भूमिकेवरून केलेला हा बंड आहे असं त्यांनी सांगितले.
गटनेते पदावरून का काढलं?; एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून संवाद
तसेच राष्ट्रवादी-काँग्रेसला सोडा, भाजपासोबत सरकार बनवा असं शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांची भूमिका हिंदुत्ववादाची आहे. अडीच वर्षापूर्वी सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी तडजोड केली. मुख्यमंत्र्यांनी आता एक क्षणही या पदावर राहता कामा नये. परंतु ती नैतिकता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. त्वरीत राजीनामा राज्यपालांकडे पोहचवायला हवा. ५५ मधले ३५ आमदार नाहीत मग वाट कशाला पाहताय? स्वाभिमानी असतील तर मुख्यमंत्री वर्षा खाली करतील असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
दरम्यान, हिंदुत्ववादी विचाराने एकनाथ शिंदे यांची जडणघडण झालीय. त्या विचारांशी बांधिलकी ठेवाल ही अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. अडीच वर्षात कुठलाही विकास केला नाही. केवळ सुडाच्या भावनेतून कारवाया, अपशब्द बोलायचा. मुख्यमंत्रिपदाची मान, शान, सन्मान घालवला. त्यामुळे जे होते चांगल्यासाठी होते. आता काही तासांत या महाराष्ट्रात काय घडतं हे पाहावं लागेल असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे हे नामधारी नगरविकास मंत्री होते. मातोश्रीबाहेर कुणालाही अधिकार नाही. नगरविकास खात्यात कुटुंबातील व्यक्तींना पूर्ण अधिकार होते. शिवसेनेच्या वाट्याचे जे सरकार होते ते केवळ मातोश्री आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी होते असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.