ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - सध्या भारत - पाकिस्तानमधील तणावामुळे 'ए दिल है मुश्किल' चित्रपट अडकला आहे. निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने आपण यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पण तरीही मनसेने आपला विरोध मागे घेतला नसून चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याच्या आपल्या भुमिकेवर ठाम आहे. या वादामध्ये आता माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी उडी घेतली आहे.
संजय मांजरेकर यांनी ट्विटच्या माध्यमातून मनसेवर टीका केली आहे. 'पक्षात एकच आमदार असतानाही मनसे धडा घेत नाही आहे. तोडफोडीच्या धमकी देत त्यांनी ठरवलं आहे की पुढच्या निवडणुकीत आपला एकही आमदार नसावा,' असा टोला संजय मांजरेकर यांनी लगावला आहे.
One MLA party, MNS, not learning their lessons. With threats of vandalism etc they are certain to be a zero MLA party next elections.— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) October 18, 2016
उरी हल्ल्यानंतर मनसेने मल्टिप्लेक्स मालकांना 'ए दिल है मुश्किल' सिनेमा प्रदर्शित न करण्याची धमकी दिल्यानंतर सिनेमाचा निर्माता करण जोहरने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी तो म्हणाला, मी देशभक्त आहे, माझ्यासाठी देश आधी आहे. यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं होतं, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे 'ऐ दिल है मुश्किल' हा सिनेमा प्रदर्शित होऊ द्यावा.
'ए दिल है मुश्किल' चित्रपट तयार करण्यासाठी ३०० भारतीय लोक दिवसरात्र झटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मी शांत का आहे असं विचारलं जात होतं. मात्र मला हेच सांगायचं होतं. देशापेक्षा मोठं काहीही नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान ऐ दिल है मुश्किल सिनेमाचं शूटिंग झालं. मात्र त्यावेळी भारत-पाकिस्तानदरम्यान शांततेसाठी सरकारचे प्रयत्न सुरु होते. शांततेसाठी आपल्या सरकारने खूप प्रयत्न केले. मला माझ्या देशभावनेचा आदर होता आणि कायम राहील.
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाक कलाकार असल्यामुळे 'ए दिल है मुश्किल' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याची तंबी मनसेनी दिली आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन करणने सुरक्षा पुरवण्याची मागणी केली त्यावर पोलिसांनीही सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.
उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत मनसेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांचा अल्टिमेटम देत भारत सोडायला सांगितले होते. यानंतर पाकिस्तान कलाकारांचा सहभाग असलेले बॉलिवूडचे सिनेमे प्रदर्शित करण्यावरही आक्षेप घेत पाक कलाकारांचा एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असेही म्हटले होते. तसेच इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युर्स असोसिएशननेही (इम्पा) पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घातली आहे. तर नुकतेच, सिनेमा ऑनर्स आणि एक्झिबिटर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा दाखवणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.