लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठीच समृद्धी मार्गाचे नियोजन आहे. कोणी कितीही विरोध केला तरी सरकार हा मार्ग करणारच आहे. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सोमवारी येथे स्पष्ट केले.साईदर्शनानंतर ते म्हणाले की, २० जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समृद्धी मार्गाचा फायदा होणार आहे. त्यासाठी तीन लाख शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यापैकी पाचशे ते हजार शेतकऱ्यांचाच विरोध आहे. त्यांच्याशी चर्चा करून सरकार तोडगा काढणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत समृद्धी मार्ग पूर्णत्वास जाण्यासाठी सरकार कटीबध्द आहे. या मार्गावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाचशे मीटरच्या आत दारुच्या दुकानास परवानगी दिली जाणार नाही.राज्यातील बाह्यवळण रस्ते असणाऱ्या शहरांतून जाणारे राज्यमार्ग व महामार्ग वर्ग करण्यासंबधी स्थानिक महापालिका अथवा नगरपालिकांनी मागणी केल्यास त्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यासंबधी सरकार सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंबंधी सरकार सकारात्मक आहे. मात्र त्यापूर्वी शेती क्षेत्रात सिंचन व पायाभूत सुविधा निर्माण करून देणे आवश्यक आहे. राज्यात भाजपाचे सरकार आल्यावर चार हजार कोटी खर्च करून ११ हजार गावांत जलसंधारणाची कामे करून पाणी साठे निर्माण केल्याने गेल्यावर्षी राज्यातील शेतीचे उत्पन्न ४० हजार कोटी झाले. यंदा त्यात वाढ होऊन ते ५० हजार कोटींवर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यात ३ लाख तूर खरेदी केली जात होती. आमच्या काळात त्यात वाढ करून ५१ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
विरोध झाला तरी समृद्धी मार्ग करणारच
By admin | Published: May 09, 2017 2:18 AM