वाशिम : राज्य सरकार केवळ विकास कामांचा गवगवा करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढून गत पाच वर्षात शासनाने केलेल्या कामांचा धिंडोरा पिटणे सुरू केले आहे. वास्तविक पाहता विकासकामे केली असती तर, मुख्यमंत्र्यांना यात्रा काढण्याची गरजच पडली नसती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी लगावला. स्थानिक विश्रामगृहात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पैठण येथून सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रेचे कारंजात आगमन झाले. यानिमित्त वाशिममध्ये सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अमीत झनक, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना अजीत पवार म्हणाले, काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्यात आली. हा निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु आता पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दाही निकाली काढण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात गत काही वर्षांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे, बेरोजगारी आणि महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यासह इतरही अनेक प्रश्न निर्माण झाले असताना ते निकाली काढण्याऐवजी विद्यमान भाजपा शासनाने जनतेचे लक्ष राष्ट्रीय मुद्यांवर केंद्रीत केले, ही खेदजनक बाब असल्याचे पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढून गत पाच वर्षात शासनाने केलेल्या कामांचा धिंडोरा पिटणे सुरू केले आहे. वास्तविक पाहता विकासकामे केली असती तर यात्रा काढण्याची गरजच पडली नसती, असा टोला यावेळी अजीत पवार यांनी लगावला. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघड करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अजीत पवार यांनी सांगितले.'मॅजीक फिगर' गाठण्यासाठीच फोडाफोडीचे राजकारणआजवरच्या इतिहासात कोणत्याही राजकीय पक्षाने विरोधी पक्षांमधील लोकांना स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी विशेष रणनिती आखली नाही; मात्र भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीत 'मॅजीक फिगर' गाठण्यासाठीच मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण अवलंबिले आहे, अशी टीकाही यावेळी अजीत पवार यांनी केली.